धुळीत हरवला पारध-धामणगाव रस्ता, परिसरातील रहिवाशांसह पादचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
धूळ खात रस्त्यावरुन वाहनधारकांचा प्रवास, परिसरातील रहिवाशी व दुकानामध्येही धुळीचा त्रास
धुळीत हरवला पारध-धामणगाव रस्ता, परिसरातील रहिवाशांसह पादचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
धूळ खात रस्त्यावरुन वाहनधारकांचा प्रवास, परिसरातील रहिवाशी व दुकानामध्येही धुळीचा त्रास
जालना (पारध), दि. 28: अंदाजे आठ ते नऊ महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुका होताच भोकरदन तालुक्यातील पारध येथील सोसायटी पासून ते जनता महाविद्यालयाच्या कोपऱ्यापर्यंत 200 मिटरचा लांब आणि 7 मिटर रुंदा डांबरीकरण असलेला मुख्य रस्ता सिमेंट काँक्रीटीकरणाच्या नावाखाली उखडण्यात आला होता. मात्र तो रस्ता करण्याअगोदर रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाली करावी अशी भूमिका पारध येथील ग्रामपंचायतने घेतली होती. परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाल्या बनविण्यासाठी बजेट नसल्याचे संबंधित विभागाने सांगितले होते. तेव्हा पासून या रखडलेल्या पारध येथील दोनशे मिटर लांब आणि 7 मिटर रुंदा मंजूर असलेला रस्ता धुळीत दिसेनासा झाला आहे. त्यामुळे परिसरात संपूर्णपणे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांबरोबर वाहनचालकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

येथील रस्त्याच्या बाजूला असलेले व्यावसायिक धुळीने त्रस्त झालेले आहे. तसेच धूळ खात पारध-धामणगाव रस्त्यावरुन वाहनधारक प्रवास करीत आहे. आधीच खड्डे, त्यात रस्त्यावरील वाढलेल्या धुळीमुळे रस्त्यावरून जाताना समोर मोठे वाहन असले तर, उडणाऱ्या धुळीमुळे दुचाकीस्वार व पादचाऱ्यांच्या नाका-तोंडात तसेच डोळ्यात मोठ्या प्रमाणावर धूळ जात आहे. वाहनधारकांबरोबर परिसरातील रहिवाशी व दुकानामध्येही धुळीचा त्रास होत आहे. त्यामुळे इमारतीमधील खोल्या व दुकानामध्ये धुळीचे थर साचत आहेत. या रस्त्यांवर जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही तोंड बांधून जावे लागत आहे.

आठ दिवसापूर्वी दि. 21 फेब्रुवारी 2025 रोजी पारध बु. येथे आयोजित नागरी सत्काराला उत्तर देताना आमदार संतोष दानवे म्हणाले की, पारध, पिंपळगाव रेणुकाईसह आदी गावांसह परिसरातील गावं माझ्या अतिशय जिव्हाळ्याचे असून या गावांच्या विकासासाठी मी कायम कटिबध्द राहील तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी परिसरातील पाणंदरस्ते, पारध ते धामणगाव रस्ता, पारध ते पारध खुर्द या रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले आहे .
आरोग्यावर गंभीर परिणाम
धुळीमध्ये अनेक आजारांच्या विषाणूंचा समावेश असतो. त्यामुळे फ्लू व इतर संसर्गजन्य आजार वाढतात. नाका-तोंडावाटे ती पोटात जाते. त्यातून जंत तसेच पोटाचे इतर आजार होऊ शकतात. त्वचारोग व डोळ्यांचे आजारही होतात. दमा व हृदयविकाराच्या रुग्णांसाठी ती धोकादायक ठरते. या धुळीचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. परिसरातील नागरिकांच्या घशाचे व श्वसनाचे आजार तसेच डोळ्यांचे विकार, ॲलर्जीचा त्रासही वाढला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी परिसरातील पाणंदरस्ते, पारध ते धामणगाव रस्ता, पारध ते पारध खुर्द या रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आमदार संतोष दानवे यांनी येथील आयोजित नागरी सत्काराच्या कार्यक्रमात सांगितले आहे. परंतु पारध-धामणगाव रस्ता होईल तेव्हा होईल, मात्र पारध येथील उखडून ठेवलेला 200 मिटरचा मुख्य रस्ता तात्काळ करावा अशी मागणी धुळीमुळे त्रस्त झालेले रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील ग्रामस्थ तसेच व्यावसायिक करताना दिसत आहे. त्यामुळे धुळीत दिसेनासे झालेल्या पारध ते धामणगांव रस्त्याचे काम संबंधित प्रशासन तात्काळ मार्गी लावणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.