जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचा महसूल विभागाचा आढावा, प्रलंबित तक्रारी निकाली काढण्याचे निर्देश
By तेजराव दांडगे

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचा महसूल विभागाचा आढावा, प्रलंबित तक्रारी निकाली काढण्याचे निर्देश
जालना, दि. २६ ऑगस्ट: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागाच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना जनतेशी संवाद साधून लोकांच्या समस्या तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले. या बैठकीला उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते.
महत्त्वाचे निर्देश:
१) क्षेत्रभेटी: जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांनी दरमहा दोन आणि तहसीलदारांनी दरमहा चार क्षेत्रभेटी कराव्यात.
२) तंत्रज्ञानाचा वापर: कार्यालयीन कामकाजात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून कार्यक्षमतेत सुधारणा करावी. मंडळ अधिकारी, तलाठी आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी ई-ऑफिस प्रशिक्षणाचे आयोजन करावे.
३) तक्रारींचे निवारण: नोव्हेंबर २०२५ पर्यंत नागरिकांच्या सर्व प्रलंबित तक्रारी निकाली काढण्याचे आदेश दिले.
४) शिबिरांची अंमलबजावणी: श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा अंतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मिशन मोडवर काम करून पाणंद रस्ते गाव नकाशावर घेणे आणि ‘सर्वांसाठी घरे’ योजनेअंतर्गत पट्टेवाटपाचा कार्यक्रम राबवणे.
५) विकसित महाराष्ट्र कृती आराखडा: मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार राबवण्यात येत असलेल्या विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या तीन बाबींवर आधारित दीडशे दिवसांच्या कृती आराखड्याची काटेकोर अंमलबजावणी करावी.
या सर्व सूचनांमुळे प्रशासकीय कामकाज अधिक जलद आणि पारदर्शक होईल, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी व्यक्त केली.