जिल्हा प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवूनच विकास कामे करावीत – राज्यमंत्री योगेश कदम
By तेजराव दांडगे

जिल्हा प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवूनच विकास कामे करावीत – राज्यमंत्री योगेश कदम
जालना, दि.4: राज्य शासन जिल्हा प्रशासनातील विविध विभागामार्फत जिल्ह्यातील विविध विकास कामे पार पाडत असते. जिल्ह्यातील विकास कामे करतांना जिल्हा प्रशासनातील विभागानी आपल्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवूनच विकास कामे करावीत अशा सूचना राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिल्या.
जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत राज्यमंत्री श्री. कदम हे बोलत होते. यावेळी आमदार अर्जून खोतकर, आमदार हिकमत उढाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदिश मिणियार, पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खेडकर, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अन्न औषध प्रशासन विभागाचे कामाकाज अपेक्षेप्रमाणे होत नसल्याची नाराजी व्यक्त करुन, यावेळी श्री. कदम म्हणाले की, बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना अंतर्गत जिल्ह्यातील कामगारांना दोन वेळचे जेवण मोफत उपलब्ध करून दिले जाते, ते कामगारांना वेळेवर मिळते का ? तसेच त्या भोजनातील अन्नाचे परिक्षण किंवा तपासणी करण्यात येते का ? जिल्ह्यातील औषध विक्रीच्या दूकानावरुन नशेच्या गोळ्यांची विक्री होत असून, यामुळे तरुण युवक नशेच्या आहारी पडत आहे. याबाबत संबंधीत औषध विक्रेत्यांवर अन्न औषध प्रशासन विभागाने काय कारवाई केली ? तसेच दूध भेसळ करणाऱ्यावर किती कारवाई करण्यात आल्या ? तसेच अन्न् औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईचा सविस्तर तपशिल सादर करण्याचे निर्देश श्री. कदम यांनी संबंधितांना यावेळी दिले. तसेच उमेद अंतर्गत महिला बचत गटांनी पारंपारिक उद्योग सोडून, नाविन्यपूर्ण उद्योग सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच महिला बचत गटासाठी मॉलचे प्रस्ताव तयार करुन, तात्काळ शासनाकडे सादर करुन त्यासाठी पाठपुरवठा करावा. तसेच जिल्ह्यातील ज्या ग्राम पंचायती मध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पुढील 30 वर्ष पाण्याचे नियोजन करुन 100 टक्के कामे झाली आहेत, अशा ग्राम पंचायतीनी ठराव दिले आहेत का ? काम पूर्ण झालेल्या ग्राम पंचायतींना आता टँकरची आवश्यकता पडू नये, अन्यथा या सर्व कामांची चौकशी करण्यात येईल. तसेच ज्या ग्राम पंचायतीच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत, त्या संबंधीत कंत्राटदारांवर कारवाई करुन त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे का ? अशी विचारणा करुन, जी कामे अपूर्ण आहेत, ती लवकरात लवकर पूर्ण करावीत. तसेच जिल्ह्यात होणाऱी विकास कामे, योजना, प्रकल्पांची माहिती लोकप्रतिनिधींना वेळोवेळी उपलब्ध करून द्यावीत. तसेच सदर कामे लोकप्रतिनीधीना विश्वासात घेवूनच करावीत, अशा सूचना ही श्री. कदम यांनी यावेळी दिल्या.
जिल्हा पुरवठा विभागाने त्यांना प्राप्त झालेल्या इष्टांक नुसार, नवीन नावे समाविष्ट करण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे. तसेच जिल्ह्यात आयपीएल सामान्यावर सठ्ठा लावण्याचे प्रकार वाढत असुन याद्वारे गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहेत, याकरीता पोलीसांनी जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधीत राहवी याकरीता संबंधीताचा शोध घेवून कठोर कारवाई करावी. तसेच सर्व विभागांनी मुख्यमंत्री यांचा शंभर दिवस कार्यक्रम यशस्वीपणे राबवावा. ई-पीक पाहणी आणि ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणीसाठी विशेष शिबीरांचे आयोजन करावेत. संपुर्ण जिल्हा परिषदेत 100 टक्के ई-ऑफीस प्रक्रिया राबविण्याचे निर्देश श्री. कदम यांनी यावेळी दिले.
यावेळी श्री कदम यांनी जिल्हा परिषद, अन्न औषध प्रशासन विभाग, पुरवठा विभाग, कायदा सुव्यवस्था आदी विभागाचा आढावा घेतला. आमदार अर्जून खोतकर आणि आमदार हिकमत उढाण यांनी देखील यावेळी विविध विभागाकडून जिल्ह्यातील पाणी पुरवठा, कायदा सुव्यवस्था आदींचा आढावा संबंधीतांकडून घेतला.
यावेळी आढावा बैठकीस जिल्हा प्रशासनातील विविध विभाग प्रमुखाची उपस्थिती होती.