दिपक बोऱ्हाडे यांची पालकमंत्री पंकजा मुंडे आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी घेतली भेट
By तेजराव दांडगे

दिपक बोऱ्हाडे यांची पालकमंत्री पंकजा मुंडे आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी घेतली भेट
जालना, दि. 27 : धनगर समाजाला एसटीचे आरक्षणाची मागणीसाठी जालना येथे आमरण उपोषणास बसलेले दिपक बोऱ्हाडे यांनी आपले उपोषण मागे घ्यावे यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ म्हणुन पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे आणि जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांनी भेट घेवून त्यांच्या प्रकृतीबाबत विचारणा करुन उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली.
यावेळी आमदार सर्वश्री अर्जुनराव खोतकर, बबनराव लोणीकर, नारायण कुचे, संतोष दानवे, हिकमत उढाण, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी याठिकाणी पालकमंत्री म्हणून आले आहे. दिपक बोऱ्हाडे यांची मागील तीन दिवसांपासून तब्येत खालावली असुन, त्यांनी धनगर समाजासाठी केलेल्या मागण्यांविषयी आमच्या मनात संवेदना आहेत. धनगर समाज या मागण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून लढा देत आहे. त्यामुळे शासन देखील तुमच्या मागण्याबाबत सकारात्मक असुन, तुमच्या न्यायासाठी लढणार आहे. परंतू हा प्रश्न चर्चेतून सोडता येईल याकरीता दिपक बोऱ्हाडे यांनी आपले उपोषण सोडून, आपले शिष्टमंडळ घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत चर्चा करण्यासाठी मुंबईला यावे असेही पालकमंत्री पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. सद्या हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबीत असून, हा प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी बैठका होत आहेत. यासाठी थोडा वेळ लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे. आपण आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहात, यात शंका नाही. शासनाला देखील वाटते की हा प्रश्न आता सुटला पाहिजे परंतू काही कायद्याच्या अडचणी असल्याने याची आपणा सर्वांना कल्पना आहे. परंतू श्री. दिपक बोऱ्हाडे हे मागील 11 दिवसापासून उपोषण करत असून इतके दिवस उपोषण करणे योग्य नाही, त्याकरीता त्यांनी आपले उपोषण सोडावे. समाजाचा प्रश्न महत्वाचा असून हा प्रश्न सोडविण्यासाठी चर्चेची आवश्यता आहे. याकरीता श्री. बोऱ्हाडे यांनी चर्चेसाठी मुंबईला यावे आपण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासोबत बसून यावर चर्चा करु असे सांगितले.
यावेळी श्री. बोऱ्हाडे यांच्या प्राथमिक चर्चा झाल्यानंतर मंत्री पंकजा मुंडे आणि गिरीष महाजन यांनी श्री. बोऱ्हाडे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून बोलणे करून दिले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी श्री. बोऱ्हाडे यांना शासन धनगर समाजाला आरक्षण देण्याकरीता सकारात्मक आहे. त्यासाठी प्रयत्न देखील करत आहे. परंतू एससी एसटी आरक्षण हे संवैधानिक आरक्षण असुन हा केंद्राचा विषय आहे. शासनाने आरक्षणाबाबत आपली बाजू मांडली आहे. परंतू सर्वोच्च न्यायालयामुळेही यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्याचे सांगुन, धनगर समाजला एसटीतून आरक्षण देण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया सांगितली. तसेच हा प्रश्न सोडविण्यासाठी जो पर्यंत चर्चा होणार नाही, तोपर्यंत मार्ग् निघणार नाही. याकरीता श्री. बोऱ्हाडे यांनी आपले उपोषण सोडून चर्चा करण्यासाठी मुंबईला येण्याचे निमंत्रण दिले.