शिक्षक पात्रता परीक्षेबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
By तेजराव दांडगे

शिक्षक पात्रता परीक्षेबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
जालना, दि.7 :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा MAHATET 2025 दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रविवार रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.या अनुषंगाने परिक्षेच्या तयारी विषयक आढावा आज दि. 7 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. मिन्नु, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती संगिता भागवत,
शिक्षणाधिकारी माध्यमिक बाळासाहेब खरात, शिक्षणाधिकारी योजना श्रीमती लता सानप, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालनाचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रकाश मांटे, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक गिरीश पुजारी , सुभाष भालेराव, विनया वडजे, रवींद्र जोशी , पी. एस. रायमल, अर्जुन पवार , संगीता गिमेकर यांची उपस्थिती होती.
या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक परिक्षा केंद्रावर व परिक्षा हॉल सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असावेत, परिक्षेत अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक परीक्षार्थींची तपासणी करण्यात यावी, परिक्षा केंद्रावर परिक्षार्थींसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात यासह अन्य निर्देश दिले.
सदर परीक्षेस जालना जिल्ह्यातून पेपर 1 साठी 3835 व पेपर 2 साठी 4508 परीक्षार्थी 15 परिक्षा केंद्रावर परीक्षा देणार आहेत. उच्च न्यायालयाने सर्व शिक्षकांसाठी TET परीक्षा अनिवार्य केल्यामुळे ही परीक्षा अनेक कार्यरत शिक्षक देखील देत आहेत.
झोनल अधिकारी, सहायक परिक्षक परीक्षा केंद्रसंचालक यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. परीक्षार्थींच्या अडचणी सोडवण्यासाठी शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद जालना याठिकाणी जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे व तो दिनांक 22/11/2025 ते 24/11/2025 या कालावधीत सुरू असेल. परीक्षा कालावधीत विविध पथके परीक्षा केंद्रास भेटी देणार आहेत.



