आकाशात ड्रोन सदृश्य वस्तू; जालना पोलिसांनी नागरिकांना घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये असे केले आवाहन
By तेजराव दांडगे

आकाशात ड्रोन सदृश्य वस्तू; जालना पोलिसांनी नागरिकांना घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये असे केले आवाहन
जालना, दि. ९ मे २०२५: जालना जिल्ह्यात काही ठिकाणी आकाशात ड्रोनसारख्या वस्तू दिसून येत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, जालना पोलीस दलाने जिल्ह्यातील नागरिकांना शांत राहण्याचे आणि कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
पोलीस अधीक्षक, जालना यांनी जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘जिल्ह्यात काही ठिकाणी ड्रोन सदृश्य वस्तू आकाशात दिसत आहेत, परंतु याबद्दल जनतेने घाबरण्याची कोणतीही गरज नाही.’ या संदर्भात अधिक माहिती देणे गोपनीयतेच्या कारणास्तव शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
तरीही, पोलीस अधीक्षक यांनी सर्व नागरिकांना आव्हान केले आहे की, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये. तसेच, सोशल मीडिया किंवा इतर कोणत्याही माध्यमातून पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. जालना पोलीस दल परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पाऊले उचलत आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
नागरिकांनी शांतता आणि संयम राखण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद गोष्टी निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन जालना पोलीस दलाने केले आहे.