जालना ITI मध्ये देशातील पहिले कॅम्पस-आधारित इन्क्युबेशन सेंटर; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘इनोव्हेशन चॅलेंज’चे उद्घाटन!
By तेजराव दांडगे

जालना ITI मध्ये देशातील पहिले कॅम्पस-आधारित इन्क्युबेशन सेंटर; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘इनोव्हेशन चॅलेंज’चे उद्घाटन!
जालना, दि. ६ जून : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मराठवाडा अॅक्सेलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेशन कौन्सिल (MAGIC) च्या सहकार्याने, जालन्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) देशातील पहिले कॅम्पस-आधारित इन्क्युबेशन सेंटर स्थापन करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे.
या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत, १० हजार चौरस फुटांची जागा मॅजिक संस्थेला उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जागेवर ‘मॅजिक-जालना आयटीआय इनोव्हेशन टेक्निकल चॅलेंज २०२५’ या नाविन्यपूर्ण स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी या उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बदनापूरचे आमदार नारायण कुचे, मॅजिकचे संचालक रितेश मिश्रा, उद्योजक नितीन काबरा, अनुज बन्सल, आयटीआय जालना येथील प्राचार्या सौ. रजनी शेलके आणि मॅजिकचे इन्क्युबेशन मॅनेजर शशिकांत तिवारी हे मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे स्वरूप आणि फायदे
या स्पर्धेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील शासकीय आयटीआय संस्थांमधील विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण आणि तांत्रिक कल्पना मागवण्यात येणार आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके, प्रमाणपत्रे आणि स्टार्टअप किट देऊन सन्मानित करण्यात येईल. विशेष म्हणजे, टॉप सहा टीम्सना थेट मॅजिक आयटीआय इन्क्युबेशन सेंटरमध्ये मार्गदर्शन व सहाय्य मिळणार आहे.
ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा
या इन्क्युबेशन सेंटरची संकल्पना महाराष्ट्र स्टार्टअप धोरण २०१८ अंतर्गत मांडण्यात आली होती. शासकीय आयटीआय कॅम्पसमधून स्थानिक समस्यांवर आधारित नाविन्यपूर्ण उपाययोजना शोधणे आणि ग्रामीण भागातील स्टार्टअप्ससाठी सक्षम पारिस्थितिकी तंत्र निर्माण करणे, हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे. मॅजिकमार्फत उभारले जाणारे हे केंद्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संशोधन, प्रोटोटायपिंग, मॉडेलिंग व टेस्टिंग लॅब्ससारख्या अत्याधुनिक सुविधा प्रदान करण्यास सज्ज होत आहे.
पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (PPP) मॉडेलवर आधारित असलेले हे केंद्र ग्रामीण भागातील जिल्हास्तरावर उभारले जाणारे देशातील पहिले आयटीआय आधारित इन्क्युबेशन सेंटर ठरले आहे. याचा लाभ जालना जिल्ह्यातील आठ शासकीय व चार खासगी आयटीआयमधील विद्यार्थी, शिक्षकवर्ग, नवउद्योजक आणि स्थानिक उद्योगांना मिळणार आहे. या उपक्रमामुळे जालना जिल्ह्यात तंत्रज्ञानावर आधारित नाविन्यपूर्ण उद्योजकतेचा नवा अध्याय सुरू झाला असून, मराठवाड्यातील टियर-२ आणि टियर-३ शहरांतील युवकांसाठी हे एक प्रेरणादायी पाऊल ठरणार आहे.