
तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
पारध, दि. २४: भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २४ वर्षीय तरुणाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता घडली आहे.
अविनाश प्रकाश काळे (वय २४, रा. पारध खुर्द) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेची माहिती अविनाशचा चुलत भाऊ सुनील गजानन काळे (वय ३०, रा. पारध बुद्रुक) यांनी पोलिसांना दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, अविनाशने पारध खुर्द शिवारात, शेत गट क्रमांक ११८ मधील आंब्याच्या झाडाच्या फांदीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक २७/२०२५, कलम १७४ सीआरपीसी नुसार नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार प्रकाश सिनकर हे करीत आहेत. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.