पारध बु. वॉर्ड 4 मधील सांडपाण्याच्या समस्येने नागरिक त्रस्त; ग्रामपंचायतीला निवेदना द्वारे दिला आंदोलनाचा इशारा
गावकऱ्यांनी दिला आंदोलनाचा पवित्रा

पारध बु. वॉर्ड 4 मधील सांडपाण्याच्या समस्येने नागरिक त्रस्त; ग्रामपंचायतीला निवेदना द्वारे दिला आंदोलनाचा इशारा
पारध, [दि. 30]: भोकरदन तालुक्यातील पारध बू येथील ग्रामपंचायत हद्दीतील वॉर्ड क्रमांक 4 मधील श्रीराम लोखंडे यांच्या घरापासून ते कृष्णा उखर्डे यांच्या घरापर्यंतच्या रस्त्यावर साचणाऱ्या सांडपाण्यामुळे आणि पावसाच्या पाण्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायतीचे लक्ष वेधण्यासाठी वॉर्डातील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात एक निवेदन दिले असून, यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, रस्त्यावर पाणी साचल्यामुळे डासांची पैदास वाढली असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या साचलेल्या पाण्यामुळे भविष्यात कोणाच्या आरोग्याला किंवा जीविताला हानी पोहोचल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीवर राहील, असा स्पष्ट उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
या निवेदनामध्ये वॉर्डातील अनेक विशिष्ट ठिकाणांचा उल्लेख करण्यात आला आहे, जिथे पाण्याची समस्या अधिक तीव्र आहे. यामध्ये सागर काटोले ते श्रीराम लोखंडे यांच्या रोडवरील पाणी, महेंद्र ठेंग ते साहेबराव सपाटे यांच्या घरासमोरील पाणी, धोंडीराम धनवई ते प्रकाश लोखंडे, तसेच दादाराव लोखंडे ते उत्तम लोखंडे यांच्या घरासमोरील रस्त्यावर साचलेल्या पाण्याची समस्या प्रमुख आहे. या सर्व ठिकाणी साचलेल्या पाण्याची योग्य विल्हेवाट ग्रामपंचायतीने त्वरित लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या निवेदनावर जयंता लोखंडे, समाधान लोखंडे, तुळशीराम धनवई, सागर काटोले, पवन लोखंडे, संतोष लोखंडे, गणेश देशमुख, विकास लोखंडे, गोपाल आल्हाट, मंगेश उखर्डे, प्रकाश लोखंडे, गणेश लोखंडे, महेंद्र ठेंग, अशोक काटोले आदींसह अनेक गावकऱ्यांच्या सह्या आहेत.
नागरिकांच्या या गंभीर इशाऱ्यानंतर ग्रामपंचायत यावर काय उपाययोजना करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.