21 वर्षांनी जुन्या बाकांवर पुन्हा गप्पा: कोसगावच्या राजर्षी शाहू विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळा
By गौतम वाघ

21 वर्षांनी जुन्या बाकांवर पुन्हा गप्पा: कोसगावच्या राजर्षी शाहू विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळा
कोसगाव: शाळेचा तो जुना बाक, खो-खोची ती जुनी मैदानं आणि वर्गातील आठवणींना 21 वर्षांनी पुन्हा उजाळा देण्यासाठी राजर्षी शाहू उच्च माध्यमिक विद्यालय, कोसगाव येथे 2004-2005 च्या तुकडीचा स्नेहमेळा पार पडला.
या भावनिक सोहळ्याची सुरुवात सरस्वती मातेच्या पूजनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दळवी सर उपस्थित होते, तर शाळेचे विद्यमान प्राचार्य कळम सर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या स्नेहसंमेलनात, उपस्थित माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी त्यांच्या शाळेच्या आठवणींना उजाळा दिला. जुनी शाळा, जुने शिक्षक आणि खो-खो, कबड्डी, क्रिकेट यांसारख्या मैदानावरचे खेळ आठवून सर्वांचे मन भावूक झाले. अनेकांनी आपल्या शालेय जीवनातील अविस्मरणीय क्षण आणि शिक्षकांनी दिलेले मार्गदर्शन याबद्दल मनोगत व्यक्त केले.
या सोहळ्यात शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत सर्व विद्यार्थ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो फ्रेम्स शाळेला सप्रेम भेट दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी शेळके यांनी केले आणि त्यांच्याच भाषणाने कार्यक्रमाचा उत्साही समारोप झाला. या कार्यक्रमाला शाळेचे सर्व आजी-माजी शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.