चंदनझिरा पोलिसांची धडक कारवाई: दारू आणि गांजा जप्त
By तेजराव दांडगे

चंदनझिरा पोलिसांची धडक कारवाई: दारू आणि गांजा जप्त
जालना, (प्रतिनिधी): जालना शहरातील चंदनझिरा पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ९७,६८० रुपयांचा गांजा आणि दारूचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन वेगवेगळ्या प्रकरणांत आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मोटारसायकलवर दारूची तस्करी उघड
पोलीस अधीक्षक अजयकुमार वंन्सल यांच्या सूचनेनुसार चंदनझिरा पोलीस ठाण्यातील पथकाने ही शोधमोहीम राबवली. पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना गुप्त माहिती मिळाली की, एमआयडीसी भागात राहुल राम गायकवाड (वय ३०) हा मोटारसायकलवरून देशी दारूची चोरटी विक्री करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तातडीने छापा मारून राहुल गायकवाडला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४ देशी दारूचे बॉक्स आणि मोटारसायकलसह एकूण ५९,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी प्रशांत देशमुख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास कृष्णा तंगे करत आहेत.
ममता नगरमध्ये गांजाचा साठा जप्त
दुसऱ्या एका कारवाईत, ममता नगर चंदनझिरा भागात एक महिला अंमली पदार्थ गांजाची अवैधरित्या विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलीस अधिकारी व महिला अंमलदारांच्या पथकाने ४५ वर्षीय महिलेच्या घरावर छापा मारला. घरातून ९६२ ग्रॅम वजनाचा, ३८,४०० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या फिर्यादीवरून या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोउपनि सय्यद करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार वंन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोउपनि मारीयो स्कॉट, पोउपनि सय्यद अफसर, सपोउपनि मनसुब वेताळ, पोलीस अंमलदार प्रशांत देशमुख, राजेंद्र ठाकुर, कृष्णा तंगे, रवि देशमुख, राजेंद्र पवार, साई पवार, अनिल चव्हाण, शरद पवार, अभिजीत वायकोस, नवनाथ पाटील, दिपक डेहंगळ, सिंधुताई खरजुले आणि रेष्मा टेकबहादुर यांचा समावेश होता.