‘कोकडा’ रोगाचा कहर: मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल, उभी पिके उपटून फेकण्याची वेळ!
By तेजराव दांडगे

‘कोकडा’ रोगाचा कहर: मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल, उभी पिके उपटून फेकण्याची वेळ!
भोकरदन तालुक्यातील पारध आणि आसपासचा परिसर हिरव्या मिरचीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येथून दररोज हजारो क्विंटल मिरची मुंबई, दिल्ली, नागपूर, वाशी आणि इतर मोठ्या शहरांमध्ये विक्रीसाठी पाठवली जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळे मिरची पिकावर ‘कोकडा’ रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकरी चांगलेच संकटात सापडले आहेत.
शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या फवारण्या करूनही या रोगावर नियंत्रण मिळत नसल्याने त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. अखेर, हतबल होऊन शेतकऱ्यांना आपली उभी पिके उपटून फेकून देण्याची वेळ आली आहे. पारध येथील शेतकरी मंगेश देशमुख यांनी आपल्या एका एकरातील मिरचीची झाडे उपटून फेकली आहेत, तर शेख सलीम यांनीही एका एकरातील मिरचीचे पीक काढून टाकले आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महागडी खते, औषधे आणि रोपे यासाठी केलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. हवामानातील बदलांमुळे मिरचीवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने हातात काहीच येणार नाही, उलट शेती अडकून पडेल, अशी भीती त्यांना वाटत होती. त्यामुळेच नाइलाजास्तव त्यांनी मिरचीचे पीक उपटून टाकण्याचा निर्णय घेतला. या गंभीर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांच्यासमोर भविष्याची चिंता उभी राहिली आहे.