डॉ. विजयकुमार कस्तुरे हिमाचल प्रदेश काव्य महोत्सवाच्या अध्यक्षपदी
By अनिल जाधव

डॉ. विजयकुमार कस्तुरे हिमाचल प्रदेश काव्य महोत्सवाच्या अध्यक्षपदी
छत्रपती संभाजीनगर: येथील आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातनाम असलेल्या बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे हिमाचल प्रदेशातील तिबेटीयन बुद्ध विहार, मनाली येथे येत्या २० ते २८ मे २०२५ दरम्यान आयोजित बहुभाषिक राष्ट्रीय काव्य महोत्सव आणि पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षपदी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील ॲडव्होकेट डॉ. विजयकुमार कस्तुरे यांची निवड झाली आहे.
संस्थेचे अध्यक्ष, स्कॉटलंड यार्ड स्टुडंट्स ब्रॅंड ॲम्बेसेडर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. संघर्ष सावळे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे डॉ. कस्तुरे यांची भेट घेऊन संस्थेच्या आणि बहुजन साहित्य संघ चिखलीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना निमंत्रण पत्र दिले व त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. याप्रसंगी डॉ. डी. व्ही. खरात सर, डॉ. बबनराव महामुने, भावकवी अंकुश पडघान, मा. शिंदे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. कस्तुरे यांनी यापूर्वी नेपाळमधील काठमांडू येथे आयोजित आंतरराष्ट्रीय बहुभाषिक कवी संमेलन, केरळ काव्य महोत्सव, तेरावे झेप साहित्य संमेलन, शिरूर अनंतपाळ साहित्य संमेलन यांसारख्या अनेक प्रतिष्ठित कार्यक्रमांचे अध्यक्षपद भूषविले आहे. यासोबतच गुजरात, गोवा, कर्नाटक आणि कोलकाता येथील बहुभाषिक राष्ट्रीय कवी संमेलनांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून त्यांनी आपली खास ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना देहूरोड बुद्ध भूमीचा भीम रत्न, केंद्रीय मानवाधिकार संघटनेचा राष्ट्रीय मानवाधिकार गौरव, महाराष्ट्र राज्य संविधान परिषदेचा संविधान गौरव, ग्लोबल ह्यूमन राईटस् प्रोटेक्शन फोरमचा आलोक बॅनर्जी मेमोरियल ॲवॉर्ड, बाबू जगजीवनराम ॲकॅडमी, गोवा यांचा बाबू जगजीवनराम पुरस्कार आणि राममोहन विद्यासागर ॲकॅडमी, कोलकाता यांचा ईश्वरचंद्र विद्यासागर आणि राजा राममोहन रॉय यांसारख्या अनेक राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, त्यांच्या समर्पित सामाजिक कार्यासाठी साऊथवेस्टर्न अमेरिकन विद्यापीठाने त्यांना ‘डॉक्टर ऑफ सोशल वर्क्स्’ ही मानद पदवी प्रदान केली आहे.
डॉ. कस्तुरे यांच्या ‘त्या तरूच्या सावलीला’ आणि ‘चल सखे बोलू जरा’ यांसारख्या कवितांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता मिळवली असून, त्या साहित्यिक रसिकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण करून गेल्या आहेत. तसेच, बहुजन साहित्य संघ, चिखलीच्या माध्यमातून त्यांनी अनेक साहित्य संमेलने आयोजित करून शेकडो कवी, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान केला आहे.
आता साहित्य धारा संस्थेने त्यांच्या कार्याचा गौरव केल्यामुळे त्यांच्या साहित्यिक जीवनात आणखी एका मानाच्या तुऱ्याची भर पडली आहे, याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.