पारध येथे विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल
By तेजराव दांडगे

पारध येथे विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल
पारध, दि. 16 : भोकरदन तालुक्यातील पारध येथे आज सकाळी एका 28 वर्षीय गृहिणीचा विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास गजानन लोखंडे (रा. पारध) असे आरोपीताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 8:00 वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला पारध येथील पाण्याच्या टाकीजवळून आपल्या चुलत सासऱ्यांच्या घरासमोरील रस्त्याने जात असताना आरोपीत कैलास लोखंडे याने तिचा हात पकडून पिरगळला. यामुळे फिर्यादीच्या हातातील बांगडी फुटून तिच्या हातात घुसली आणि तिला दुखापत झाली. त्यानंतर आरोपीताने फिर्यादीला स्वतःजवळ ओढून तिच्या मनाला लज्जा वाटेल अशा उद्देशाने तिच्या छातीला हात लावला आणि शिवीगाळ केली, असे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेनंतर फिर्यादीने तात्काळ पोलिसांत धाव घेऊन जबाब दिला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या आदेशाने या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नेमाणे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करणारे अधिकारी पोहेकाँ एस. बी. जावळे असून, पुढील तपास पोउपनि वाल्मीक नेमाणे हे करत आहेत.