पारध येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत ‘कॅन्टीन डे’ उत्साहात; विद्यार्थ्यांनी केला २५ हजारांचा व्यवसाय
सह. प्रतिनिधी - कृष्णा लोखंडे

पारध येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत ‘कॅन्टीन डे’ उत्साहात; विद्यार्थ्यांनी केला २५ हजारांचा व्यवसाय
पारध, दि. ०८ (जालना): विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, व्यवहारज्ञान आणि सहकार्याची भावना रुजावी या उद्देशाने भोकरदन तालुक्यातील पारध येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत ‘कॅन्टीन डे’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलच्या माध्यमातून सुमारे २५ हजार रुपयांची उलाढाल करत आपल्या व्यावसायिक कौशल्याची चुणूक दाखवली.
मान्यवरांची उपस्थिती आणि कौतुक
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, माजी जि. प. सभापती मनीष श्रीवास्तव, उपसरपंच शेखर श्रीवास्तव, माजी पं. स. सभापती परमेश्वर लोखंडे, रा. कॉ. जिल्हा सरचिटणीस प्रा. संग्राम देशमुख, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा नेते अजहर पठाण, ग्रामपंचायत सदस्य समीखान पठाण, सलीमखान पठाण, शेख शकील, शिवा लोखंडे, पवन लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि मेहनतीचे विशेष कौतुक केले.
पत्रकारांची विशेष उपस्थिती
या उपक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी पत्रकार रामसिंग ठाकूर, गजानन देशमुख, समाधान तेलंग्रे, सागर देशमुख, शकील भाई, रमेश जाधव आणि कृष्णा लोखंडे यांनी विशेष उपस्थिती लावून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.
व्यवहारज्ञानाचे धडे
शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. पदार्थांची मांडणी, विक्री, हिशोब आणि ग्राहकांशी संवाद साधण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात केले. स्वच्छतेचे नियम पाळून हा उपक्रम राबवण्यात आला, ज्याला पालक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यांचे लाभले सहकार्य
हा अभिनव उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक जाहेर कुरेशी, शेख सोहेल, अनिस कुरेशी, कु. हिना बाजी व जैद पठाण यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुश्ताक सरदार पठाण, उपाध्यक्ष शेख जुबेर आणि सर्व सदस्यांनी या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.



