
जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभाग नोंदवण्याचे आवाहन
जालना, दि. 04: जागतिक कौशल्य स्पर्धा सन 2026 मध्ये शांघाई येथे आयोजित करण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्हा, विभाग, राज्य आणि देशस्तरावर स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून, त्याद्वारे गुणवान व पात्र कौशल्यधारक स्पर्धकांची निवड केली जाणार आहे. सदर स्पर्धा दर दोन वर्षांनी होत असून ती ही जगातील सर्वांत मोठी व्यवसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा आहे. या स्पर्धेत जगभरातील 23 वर्षाखालील युवक-युवतींना त्यांची कौशल्ये प्रदर्शित करण्याची संधी मिळते. ही स्पर्धा ऑलिंपिक खेळांच्या तोडीस तोड मानली जाते. भारतामधील प्रतिभावान व कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने, जालना जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींनी विविध 63 क्षेत्रांमध्ये होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत https://kaushalya.mahaswayam.gov.in किंवा https://www.skillindiadigital.gov.in/home या संकेतस्थळावर ऑनलाइन नावनोंदणी करावी.
यापुर्वी 47 जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये 63 सेक्टर मधुन 50 देशातील 10000 उमेदवार समाविष्ट असून सदर स्पर्धा 15 देशात 12 आठवडयासाठी आयोजित करण्यात आली होती. यापुढील जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 मध्ये शांघाई येथे आयोजित होणार आहे.
जागतिक कौशल्य स्पर्धा २०२6 करीता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. सदर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी, 2004 किंवा तद्नंतरचा असावा. तसेच, Digital Construction, Cloud Computing, Cyber Security, ICT Network Infrastructure, Additive Manufacturing, Industrial Design Technology, Industry 4.0, Mechatronics, Optoelectronic Technology, Robot Systems Integration, Water Technology, Dental Prosthetics, Aircraft Maintenance या क्षेत्राकीता उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी, 2001 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे.
याप्रमाणे, शांघाई येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 साठी जिल्हा, विभाग, राज्य, आणि देश पातळीवरून प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेकरिता सर्व शासकीय आणि खाजगी औद्यौगिक प्रशिक्षण संस्था, एमएसएमई टूल रूम्स, सिपेट, आयआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतन महाविद्यालये, आयएचएम/हॉस्पिटेलिटी इंस्टीट्यूट, कॉर्पोरेट टेक्निकल इंस्टीट्यूट, स्किल ट्रेनिंग इंस्टीट्यूट, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, एमएसबीव्हीटी, खाजगी कौशल्य विद्यापीठ, इंस्टीट्यूट ऑफ ज्वेलरी मेकिंग, इतर सर्व प्रशिक्षण संस्था, कला, वाणिज्य, विज्ञान शाखेची कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, तसेच, महाराष्ट्र राज्य कौशल्य सोसायटी कडे अधिनस्त सर्व व्यवसायिक कौशल्य प्रशिक्षण संस्था, विविध व्यावसायिक आस्थापना आणि कारखाने यांचेकडील विहीत वयोमर्यादेतील इच्छूक प्रतिभासंपन्न व कुशल उमेदवारांचे नामांकन या स्पर्धेसाठी करता येईल. तसेच, या स्पर्धेत निवड झालेल्या उमेदवारांना वेळोवेळी लागणारे मार्गदर्शन व सहाय्य महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई यांचेकडून करण्यात येईल.
त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी www.kaushalya.mahaswayam.gov.in किंवा https://www.skillindiadigital.gov.in/home या संकेतस्थळावर दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत नोंदणी करून आपला सहभाग निश्चित करावा. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता जालना, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.