वाढदिवसाच्या पार्टीसाठी व्यापाऱ्याला लुटले; जालना पोलिसांनी चार तरुणांना ठोकल्या बेड्या
By तेजराव दांडगे

वाढदिवसाच्या पार्टीसाठी व्यापाऱ्याला लुटले; जालना पोलिसांनी चार तरुणांना ठोकल्या बेड्या
जालना, दि. ०३ : मौजमजेसाठी आणि वाढदिवसाची पार्टी साजरी करण्यासाठी गुन्हेगारीचा मार्ग पत्करणे चार तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. शहरातील एका व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी चंदनझिरा पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत चार आरोपींना अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास तक्रारदार निलेश अशोक अग्रवाल हे आपल्या स्कुटीवरून श्रीकृष्ण-रुक्मिणी नगर भागातून घरी जात होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या चार जणांच्या टोळक्याने त्यांना अडवले. आरोपींनी अग्रवाल यांना चाकूचा धाक दाखवला आणि मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यांच्याजवळील १२,००० रुपये जबरीने लुटून आरोपीत पसार झाले होते. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांची तत्पर कारवाई
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले होते. पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गोपनीय माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या साहाय्याने शोध सुरू केला. अवघ्या काही वेळातच पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चारही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपीत:
१) बाळा जगन्नाथ पिंपराळे (वय १९)
२) दिपक भगवान निर्मल (वय २०)
३) अजय बबन पवार (वय १८)
४) विशाल धुराजी हिवाळे (वय २२)
लुटमारीचे कारण ऐकून पोलीसही अवाक
पोलिसांनी आरोपीतांची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. केवळ वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि नशेच्या धुंदीत मौजमजा करण्यासाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी हा लुटमारीचा कट रचला होता. एका व्यापाऱ्याला लक्ष्य करून त्यांनी ही गंभीर घटना घडवून आणली.
”तरुणाईने अशा प्रकारे गुन्हेगारीकडे वळणे ही सामाजिक चिंतेची बाब आहे. नशेच्या आहारी जाऊन गुन्हे करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जातील. सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही.” — बाळासाहेब पवार, पोलीस निरीक्षक, चंदनझिरा
ही कारवाई कोणी केली?
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि बाळासाहेब पवार, सपोनि सुशील चव्हाण, पोउपनि मारियो स्कॉट आणि त्यांच्या पथकाने (अशोक जाधव, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे व अन्य कर्मचारी) फत्ते केली. प्रकरणाचा पुढील तपास पोहेकों अशोक जाधव करत आहेत.



