गणेशोत्सवाच्या शांततेसाठी ‘मद्यविक्री’ला ब्रेक; २७ ऑगस्ट रोजी सर्व दुकाने बंद
By तेजराव दांडगे

गणेशोत्सवाच्या शांततेसाठी ‘मद्यविक्री’ला ब्रेक; २७ ऑगस्ट रोजी सर्व दुकाने बंद
जालना, दि. २६: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई मद्य निषेध अधिनियम १९४९ नुसार, बुधवार, २७ ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातील सर्व देशी-विदेशी मद्यविक्री आणि ताडी-माडीची दुकाने संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी कार्यालयाने दिला आहे. या नियमाचे पालन न करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांवर मुंबई मद्य निषेध अधिनियमातील तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.
या आदेशामुळे गणेशोत्सवाचा पहिला दिवस शांततेत पार पडण्यास मदत होणार आहे. मात्र, याच वेळी अवैध दारूविक्री करणाऱ्यांवरही लक्ष ठेवणे आवश्यक आहे, कारण अशा बंदचा फायदा घेत काही लोक चढ्या दराने दारू विकू शकतात.