गाडी घेतलीये? थांबा! 1 जुलैपासून वाहन करांचे ‘गियर’ बदलले, आता जास्त पैसे मोजावे लागणार!
By तेजराव दांडगे

गाडी घेतलीये? थांबा! 1 जुलैपासून वाहन करांचे ‘गियर’ बदलले, आता जास्त पैसे मोजावे लागणार!
जालना, दि. 2 (D9 news) – गाडी घेण्याचा विचार करताय किंवा तुमच्याकडे आधीच गाडी आहे? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एकीकडे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढताना, आता सरकारने वाहनधारकांवरील करांचा बोजा आणखी वाढवला आहे. गृह विभागाने काढलेल्या अधिसूचनेनुसार, 1 जुलै 2025 पासून महाराष्ट्रात वाहनांवर सुधारित कर लागू झाले आहेत. जालना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सर्व वाहनधारकांना आणि वाहतूक संघटनांना याची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आता तुमच्या खिशाला आणखी कात्री लागणार हे नक्की!
कुणाचे किती पैसे वाढणार? वाचा सविस्तर
CNG/LPG वर चालणाऱ्या खाजगी गाड्या:
₹10 लाखांपर्यंतच्या गाड्या: पूर्वी 7% कर होता, आता 8% भरावा लागेल.
₹20 लाखांपर्यंतच्या गाड्या: पूर्वी 8% कर होता, आता 9% भरावा लागेल.
₹20 लाखांवरील गाड्या: पूर्वी 9% कर होता, आता 10% भरावा लागेल.
बॅटरीवर चालणाऱ्या (Electric) गाड्या:
• जर तुमच्या बॅटरीवर चालणाऱ्या गाडीची किंमत ₹30 लाखांपेक्षा जास्त असेल, तर आता वाहनाच्या किमतीच्या 6% इतका कर भरावा लागेल.
बांधकाम कामांसाठी वापरली जाणारी अवजड वाहने (उदा. क्रेन, कॉम्प्रेसर):
• या वाहनांवर आतापर्यंत त्यांच्या वजनानुसार (UW/GVW) वार्षिक कर आकारला जात होता. पण आता हा नियम बदलला आहे! यापुढे वाहनाच्या किमतीच्या 7% इतका कर एकरकमी (One-time) आकारला जाईल. म्हणजे एकदाच भरून मोकळे.
हलकी मालवाहतूक वाहने (7500 किलोग्रॅमपर्यंत वजनाची):
• जी वाहने 7500 किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाची आहेत आणि मालवाहतुकीसाठी वापरली जातात, त्यांच्यावरही आधी वजनानुसार वार्षिक कर होता. पण आता या वाहनांवरही बांधकामाच्या अवजड वाहनांप्रमाणेच, वाहनाच्या किमतीच्या 7% इतका कर एकरकमी भरावा लागेल.
थोडक्यात, तुम्हाला नवीन वाहन घ्यायचं असेल किंवा तुमच्याकडे सध्याचं वाहन असेल, तर या वाढीव करांसाठी तयार राहा. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेल्या या माहितीची नोंद घेऊन त्यानुसार आपली आर्थिक तयारी करून घेणे शहाणपणाचे ठरेल.