छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात अंमली पदार्थ तस्करांना मोठा झटका! दीड कोटींचा मुद्देमाल जप्त
By गौतम वाघ

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात अंमली पदार्थ तस्करांना मोठा झटका! दीड कोटींचा मुद्देमाल जप्त
छत्रपती संभाजीनगर, दि. 11: छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राला नशामुक्त करण्याच्या दिशेने विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. मे २०२५ या एका महिन्यात परिक्षेत्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अंमली पदार्थविरोधी पथकाने जोरदार कारवाई करत तब्बल दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या तस्करी करणाऱ्यांना मोठा झटका बसला आहे.
वीरेंद्र मिश्र यांनी परिक्षेत्रातील सर्व पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार, मे २०२५ मध्ये छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, जालना, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये एकूण २४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत एकूण ४४ आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईत ५५० किलो गांजा, बेकायदेशीररित्या नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या २००० औषधी गोळ्या आणि एमडी पावडर असा एकूण १.५० कोटी रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केला आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी जनतेला आवाहन केले आहे की, नशायुक्त पदार्थांची विक्री करणारे, नशा करणारे किंवा अंमली पदार्थ बाळगणारे इसम यांची माहिती संबंधित पोलीस अधीक्षकांना द्यावी, जेणेकरून या समाजविघातक कृत्यांना आळा घालता येईल.