लेख – मराठीचा अभिजात दर्जा मराठीला व्यापकता प्रदान करेल…….
माझा मराठ्ठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके,असा मराठीचा गौरव संत ज्ञानेश्वर यांनी केला आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने भारतातील सर्व 450विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणे शक्य होणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वित्तीय तरतुदीची सोय होणार आहे.मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था,व्यक्ती विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत मिळणे शक्य होईल. सध्या देशात तमिळ, तेलुगु संस्कृत, कन्नड मल्याळम व ओरिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आता मराठी भाषेला जवळपास 23 वर्षांनी अभिजात भाषेचा दर्शा मिळालेला आहे.मराठी भाषेला जवळपास दोन हजार वर्षांपासूनचा इतिहास आहे. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या समितीने मराठी भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती आणि मराठीचे वय किमान अडीच हजार वर्ष जुने असल्याचे पुरावे दिले आहेत.मराठी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय व सामाजिक स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. शिक्षण,वाणिज्य, तंत्रज्ञान,कृषी संगणक, जागतिक ज्ञान भाषांतर, संगीत,चित्रकला अशा सर्व क्षेत्रात मराठीचा वापर वाढवला पाहिजे. मराठी भाषांतर केंद्र स्थापन करून इतर भाषेतील अभिजात साहित्यकृती मराठीत व मराठीतील अभिजात साहित्यकृती इतर भाषांमध्ये नेल्यामुळे मराठी भाषा जागतिक पातळीवर जाईल यात शंका नाही.न्यायदानाचे काम देखील मराठीमध्ये व्हावे यासाठी जोमाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. बस स्टॅन्ड रेल्वे,हवाई अड्डे इथे देखील मराठीत सूचना प्रणाली असायला हवी. वर्तमानपत्रे,चित्रपट,टीव्ही सिरीयल रस्त्यावरील सूचना देणारे बोर्ड हे देखील मराठी भाषा संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी मोठं काम करत असतात. त्याकडे सर्वच लोकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. अशाप्रकारे मराठी भाषा खालपासून वरपर्यंत पसरत जाईल व उन्नत होईल. आपल्याला मराठीचा अभिमान बाळगायचा असेल तर आपला सर्व व्यवहार मराठी मधून करणे गरजेचे आहे.