उत्तन-विरार सागरी मार्गाच्या सुधारित किफायतशीर प्रस्तावास मान्यता
Approved revised cost-effective proposal for Uttan-Virar sea route

उत्तन-विरार सागरी मार्गाच्या सुधारित किफायतशीर प्रस्तावास मान्यता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) सादर केलेल्या उत्तन-विरार सागरी मार्ग (UVSL) प्रकल्पाच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली. ₹87,427.17 कोटींच्या मूळ अंदाजाच्या तुलनेत आता फक्त ₹52,652 कोटी खर्चाच्या किफायतशीर पर्यायास पसंती देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, हा प्रकल्प वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्गाशी जोडण्यात येणार असून, मुंबईला उत्तर उपनगरांपासून पश्चिम किनारपट्टीपर्यंत जलद मालवाहतूक व प्रवासी वाहतुकीसाठी सक्षम मार्ग मिळणार आहे. या सागरी मार्गाच्या माध्यमातून वडोदरा-मुंबई एक्स्प्रेसवेशी थेट जोडणी होणार असून, त्यामुळे हा प्रकल्प केवळ वाहतुकीपुरता मर्यादित न राहता भारताच्या बंदर आधारित विकास दृष्टीकोनालाही बळकटी देणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रकल्पासाठी सादर करण्यात आलेल्या 6 पर्यायांमध्ये पर्यावरणपूरक, आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि यंत्रसामुग्रीच्या दृष्टीने कार्यक्षम पर्यायाची निवड करण्यात आली. या पर्यायामुळे सुमारे ₹34,775 कोटींची बचत शक्य झाली आहे. या संपूर्ण प्रक्रियेच्या अनुषंगाने निधी संकल्पनाही स्पष्ट करण्यात आली असून, एकूण प्रकल्प खर्चातील ₹37,998 कोटी (72.17%) रक्कम जायका (JICA) किंवा अन्य बहुपक्षीय निधीकडून टोल वसुलीच्या आधारे परतफेडीच्या स्वरुपात प्रस्तावित आहे, तर उर्वरित ₹14,654 कोटी (27.83%) भांडवली स्वरूपात महाराष्ट्र सरकार किंवा एमएमआरडीएकडून उपलब्ध होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएला सुधारित व अद्ययावत तपशीलवार प्रकल्प अहवाल (DPR) आणि प्राथमिक प्रकल्प अहवाल (PPR) शासनास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रकल्प खर्च कपातीमागील मुख्य कारणे
✅ लेन डिझाइन बदल: 4+4 लेनऐवजी 3+3 लेन, कनेक्टरसाठी 2+2 लेन; यामुळे सिव्हिल कामांमध्ये बचत होणार आहे.
✅ स्मार्ट नियोजन: भविष्यातील रस्ते-जोडण्या आणि विद्यमान रस्ते लक्षात घेऊन गरजेपुरते बजेट ठरवले आहे.
✅ जमीन अधिग्रहणात बचत: लेन रुंदी कमी केल्यामुळे जागेची गरज कमी; त्यामुळे अधिग्रहण व भरपाई खर्च घटला.
✅ कनेक्टर रचना सुधारणा: पूर्वी दोन खांबांवर रचना होती, आता एका खांबावर – बांधकाम खर्च व पर्यावरणीय परिणाम कमी.
असा आहे प्रकल्प
🔸 एकूण लांबी: 55.12 किमी
🔸 मुख्य सागरी मार्ग: 24.35 किमी
🔸 कनेक्टर्स: 30.77 किमी
🔸 उत्तन कनेक्टर (9.32 किमी) – बृहन्मुंबई महापालिकेच्या दहिसर-भाईंदर लिंक रोडशी जोड
🔸 वसई कनेक्टर (2.5 किमी) – पूर्णपणे उन्नत
🔸 विरार कनेक्टर (18.95 किमी) – वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेला जोडणारा
बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.