विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बैठकीत घेतला विविध विषयांचा आढावा
By तेजराव दांडगे

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बैठकीत घेतला विविध विषयांचा आढावा
जालना, दि. 16 : विधान परिषदेच्या उपसभापती श्रीमती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत जालना जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा घेऊन प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अवकाळी पाऊस, महिला अत्याचार, पाणी टंचाई, ऊसतोड आणि घरकाम कामगार आदी विषयांचा संबंधित विभागप्रमुखांकडून आढावा घेतला. यावेळी बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, प्रभारी पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, महिला व बालविकास अधिकारी कोमल कोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. कापसे आदींची उपस्थिती होती.
ऊसतोड कामगार महिलांसाठी आरोग्य सर्वेक्षण गरजेचे
ऊसतोड कामगार महिलांसाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेताना श्रीमती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्यविषयक सर्वेक्षणाची आवश्यकता आहे. नोंदणी झालेल्या ऊसतोड कामगारांना नोंदणी कार्डचे वितरण करावे. तसेच शासनाच्या योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील घरकाम करणाऱ्या कामगारांचे सर्वेक्षण करून त्यांची माहिती संकलित करावी. केवळ मुलींची माता असल्याने नाकारण्यात येणाऱ्या मातांना मदत करण्याचा प्रयत्न करावा.”
बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक
“जिल्ह्यात बालविवाहाच्या बाबतीत चांगले काम झाले आहे. परंतु हे प्रमाण कमी करण्यासाठी गावपातळीवर जनजागृती होणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने समाजसेवी संस्थांना या मोहिमेत सहभागी करून घ्यावे. तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत येणाऱ्या प्रकरणांतील पीडित मुलींना महिलाविषयक योजनांची माहिती मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच या मुलींचे पुनर्वसन व सशक्तीकरणावर भर देण्यात यावा. पोलीस विभागाने तयार केलेल्या मुलांसाठी जागरूकता पुस्तिकांचे समाज माध्यम आणि बचत गटांमार्फत जनजागृती करावी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांचे गट तयार करून त्यांच्यामार्फत महिलाविषयक कायद्यांचा प्रसार करावा. जिल्ह्यातील बेपत्ता मुलींबाबत तपास वेगाने पूर्ण करावा. तसेच अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. जिल्ह्यातील रिक्त पोलीस पाटलांची पदे भरण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी. तसेच जिल्ह्यात बालस्नेही पोलीस स्टेशन सुरू करायचे असल्यास त्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही यावेळी उपसभापती श्रीमती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.”
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा
“मागील काही दिवसांत राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस झाला असून, जालना जिल्ह्यातही अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळेल यासाठी प्रयत्न करावे. तसेच पावसाळ्यात वीज पडून अनेक नागरिकांचा मृत्यू होतो. यासाठी जिल्ह्यात महत्त्वाच्या ठिकाणी वीज नियंत्रक उभारावेत,” असे निर्देश श्रीमती डॉ. गोऱ्हे यांनी दिले.
पाणी टंचाईवर तात्काळ उपाययोजना करा जालना जिल्ह्यातील पाणी टंचाईचा आढावा घेताना श्रीमती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “पिण्याच्या पाण्याची समस्या मोठी असून, नागरिकांची मागणी येताच पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी तात्काळ योग्य नियोजन व उपाययोजना करावी.”
यावेळी बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, प्रभारी पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि महिला व बालविकास अधिकारी कोमल कोरे यांनी सादरीकरणांद्वारे माहिती सादर केली. बैठकीस सर्व संबंधित विभागांचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.