ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात पिंपळगाव रेणुकाईच्या राजुरेश्वर दिंडीचे पंढरीकडे प्रस्थान! भक्तीचा महासागर, तरुणाईचा सहभाग!
By तेजराव दांडगे

ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात पिंपळगाव रेणुकाईच्या राजुरेश्वर दिंडीचे पंढरीकडे प्रस्थान! भक्तीचा महासागर, तरुणाईचा सहभाग!
पारध, दि. 19 (प्रतिनिधी): महाराष्ट्राची महान वारी परंपरा जपण्यासाठी पिंपळगाव रेणुकाई येथून राजुरेश्वर प्रासादिक दिंडी क्रमांक २६२ ने मोठ्या उत्साहात १७ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान केले. ह.भ.प. विष्णू महाराज सास्ते यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १३ वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेला हा पायी दिंडी सोहळा, १८ जून रोजी देहू येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या सानिध्यात पोहोचला आणि त्यानंतर तुकोबाराया व ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये विलीन होऊन पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला.
या दिंडी सोहळ्यात सुमारे ३०० वारकऱ्यांनी सहभाग घेतला असून, येत्या एक-दोन दिवसांत आणखी काही वारकरी दिंडीत सामील होणार आहेत. गावातील श्री राजेंद्रशेठ देशमुख यांच्या हस्ते श्रीफळ फोडून दिंडीचे प्रस्थान झाले. यावेळी श्री कडूबा तात्या देशमुख, शिवाजी बाबा काकडे, सरपंच भागवत पालकर, विठ्ठल खेकाळे, अंबादास महाराज लोखंडे, ऋषी महाराज देशमुख यांच्यासह समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दिंडीची सर्वात खास गोष्ट म्हणजे महिला, पुरुष आणि तरुण मंडळींचा यात असलेला मोठा सहभाग. लाखो वारकरी एकत्र असतानाही, कुणालाही धक्का न लागता, हरिनामाच्या गजरात एक-एक पाऊल पंढरीच्या दिशेने टाकण्याचा त्यांचा संयम आणि शिस्त कौतुकास्पद आहे. दिंडीत गायक, वादक आणि गुणीजन महाराज मंडळीही मोठ्या संख्येने सहभागी असून, त्यांच्या सुमधुर भजनांनी व नामस्मरणाने संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले आहे.
वारीची ही महान परंपरा महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक आणि आध्यात्मिक संस्कृतीचे प्रतीक आहे. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता लाखो वारकरी या भक्तिशक्तीच्या भव्य आणि दिव्य सोहळ्यात सहभागी होतात. तरुण पिढीलाही या वारीमुळे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेची ओळख होते, आणि त्यातून त्यांनाही या सोहळ्यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळते.
ह.भ.प. विष्णू महाराज सास्ते यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ही राजुरेश्वर प्रासादिक दिंडी क्रमांक २६२, पंढरीच्या दिशेने आपलं प्रत्येक पाऊल विठ्ठल नामाच्या गजरात टाकत आहे.