
पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, चकमकीत भारतीय जवान शहीद
जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. पहलगाममध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 25 भारतीय नागरिक आणि नेपाळमधील एका पर्यटकाचा बळी गेला होता. या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश असल्याने संपूर्ण देशात शोक आणि संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरला लक्ष्य केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उधमपूर जिल्ह्यातील डुडु-बसंतगड परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला आहे. सुरक्षा दल या भागात शोध मोहीम चालवत असताना दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. भारतीय जवानांनीही तात्काळ प्रत्युत्तर दिले. सध्या या ठिकाणी लष्कराने दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले असून, चकमक अजूनही सुरू आहे. या घटनेत काही जवान जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या हल्ल्यामुळे देशभरात पुन्हा एकदा तीव्र दुःख आणि संताप व्यक्त होत आहे.
या चकमकीच्या पार्श्वभूमीवर डुडु-बसंतगड परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. स्थानिक पोलीसही या संयुक्त मोहिमेत सहभागी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या काश्मीर खोऱ्यात 100 हून अधिक दहशतवादी सक्रिय आहेत. त्यामुळेच पहलगाम येथील हल्ल्यानंतर सुरक्षा दल अधिक सतर्क झाले असून, सातत्याने चकमकीच्या घटना समोर येत आहेत.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने मोठी कारवाई सुरू केली आहे. बुधवारी सुरक्षा दलांनी सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. या कारवाईत दोन दहशतवादी मारले गेले. त्यांच्याकडून दोन एके सीरीज रायफल्स, चीनमध्ये बनलेले पिस्तूल, 10 किलोग्रॅम वजनाचे स्फोटक (IED) आणि इतर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. हे दहशतवादी मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होते, मात्र सुरक्षा दलांनी वेळीच कारवाई करत त्यांचा मनसुबा उधळून लावला.