धार्मिक भावना दुखावणाऱ्या कृत्याचा पर्दाफाश: पारध पोलिसांची तत्परता, एका संशयिताला अटक
By तेजराव दांडगे
धार्मिक भावना दुखावणाऱ्या कृत्याचा पर्दाफाश: पारध पोलिसांची तत्परता, एका संशयिताला अटक
जालना, दि. २२ सप्टेंबर, २०२५: प्राचीन हेमाडपंथी महादेव मंदिराला अपवित्र करण्याचा कट उधळत पारध पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. मंदिराच्या आवारात मांस आणि हाडे टाकून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या जलद कारवाईमुळे पुढील अनुचित प्रकार टळला.
नेमकं काय घडलं? पोलीस स्टेशन पारध येथे कृष्णा रामा सोनवणे, वय-५२, यांनी तक्रार दाखल केली होती. ते पुरातत्व विभागाचे कर्मचारी असून मंदिराचे पहारेकरी आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजण्यापूर्वी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मंदिराच्या संरक्षण भिंतीच्या गेटला मांस लटकवून आतमध्ये हाडे टाकली होती. या कृत्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले.
पोलिसांची धडाकेबाज कारवाई, चक्रे वेगाने फिरली: या तक्रारीवरून पारध पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाला बोलावले. घटनास्थळावरून मांस आणि हाडे जप्त करून तपास सुरू केला.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, नंदकिशोर सुरेश वडगांवकर (वय-३८, रा. आन्वा) हा संशयितरित्या मंदिराजवळ फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात इतर आरोपीतांचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. याशिवाय, सोशल मीडियावर या घटनेशी संबंधित आक्षेपार्ह क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली असून, यापुढे असे प्रकार करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनीही तपासात सहकार्य केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.डी. माने, उपनिरीक्षक व्ही.एस. नेमाने, पोहेकॉ प्रकाश सिनकर, पोअं संतोष जाधव, पोअं गणेश निकम आणि इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी केली.
समाजात शांतता राखण्याचे आवाहन: या घटनेमुळे धार्मिक स्थळांची पवित्रता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून, नागरिकांनी शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे.



