पारध शिवारात जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न
By तेजराव दांडगे

पारध शिवारात जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न
पारध, दि. 11: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध शिवारात जुन्या भांडणाच्या कारणावरून व आंब्याच्या झाडाला दगड मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. यात दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आज, ११ जून २०२५ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल प्रभाकर लोखंडे (वय २९, रा. पारध) यांनी भोकरदन पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ते त्यांचा भाऊ वैभव लोखंडे आणि मित्र हर्षल सांडु पवार यांच्यासोबत पारध शिवारातील त्यांच्या गट क्रमांक १०६ मधील शेतात होते. त्यावेळी अनिकेत लोखंडे, दत्ता त्र्यंबक लोखंडे, अरुण त्र्यंबक लोखंडे, रंजना अरुण लोखंडे आणि आरती अरुण लोखंडे (सर्व रा. पारध) हे तिथे आले.
आरोपीत आणि फिर्यादी यांच्यात जुन्या भांडणावरून तसेच सामाईक आंब्याच्या झाडाला दगड मारल्याच्या कारणावरून वाद सुरू झाला. या वादातून आरोपीत क्रमांक १, अनिकेत लोखंडे याने फिर्यादीचा भाऊ वैभव लोखंडे यांच्या डोक्यात दगड मारून गंभीर दुखापत केली आणि त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तर आरोपीत क्रमांक २, दत्ता त्र्यंबक लोखंडे याने हर्षल पवार यांच्या डोक्यात लाकडी काठीने मारून त्यांनाही जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
यावेळी आरोपीत क्रमांक ३, ४, आणि ५ (अरुण त्र्यंबक लोखंडे, रंजना अरुण लोखंडे, आरती अरुण लोखंडे) यांनी फिर्यादी, त्यांचा भाऊ वैभव आणि मित्र हर्षल यांना काठीने, हाताने व चापटाने मारहाण करत शिवीगाळ केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेनंतर, जखमी वैभव प्रभाकर लोखंडे आणि हर्षल सांडु पवार यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सपोनि संतोष माने यांच्या आदेशाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हेड कॉन्स्टेबल पी. जी. सरडे यांनी हा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पीएसआय श्री नेमाने हे करत आहेत.