पारध गावाचा अनोखा उत्सव: जिथे होते राक्षसणीची पूजा!
By तेजराव दांडगे

महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील पारध गावाचा अनोखा उत्सव: जिथे होते राक्षसणीची पूजा!
तुम्ही कधी ऐकलंय का की एखाद्या गावात एखाद्या राक्षसाची किंवा राक्षसीची पूजा होते? नाही ना? पण महाराष्ट्रातील एका गावात हेच घडतंय! मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पारध (शाहूराजा) नावाचं एक गाव आहे. हे गाव फारच अनोखं आहे. कारण इथले लोक चक्क महाभारतातील एक राक्षसी असलेली हिडिंबा हिला आपली कुलदेवी मानतात आणि तिची अगदी भक्तिभावाने पूजा करतात.
हे वाचून आश्चर्य वाटलं असेल, पण पारध गावासाठी ही काही नवीन गोष्ट नाही. शेकडो वर्षांपासून ही परंपरा इथे चालू आहे. दरवर्षी भाद्रपद शुद्ध द्वितीयेला (या वर्षी २४ ऑगस्ट) इथे हिडिंबा आणि महर्षी पराशर यांची मोठी यात्रा भरते. यात्रेसाठी बुलडाणा, जालना, जळगाव, छत्रपती संभाजीनगर म्हणजेच मराठवाडा, खान्देश आणि विदर्भातून हजारो भाविक येतात आणि हिडिंबेचे दर्शन घेतात.
पण का होते हिडिंबेची पूजा?
याच्यामागे एक मोठी पौराणिक कथा आहे. महाभारत काळात जेव्हा पांडव वनवासात होते, तेव्हा काही काळ ते या भागात राहिले होते. हा भाग तेव्हा घनदाट दंडकारण्याचा भाग होता. इथेच मायावी हिडिंबेचं वास्तव्य होतं. तिने सुंदर स्त्रीचं रूप धारण करून बलशाली भीमाला मोहित केलं आणि त्यांच्यासोबत विवाह केला. त्यानंतर त्यांना घटोत्कच नावाचा वीर पुत्र झाला.
महाभारताच्या युद्धात याच घटोत्कचने अर्जुनाचा जीव वाचवला आणि युद्धाला एक वेगळीच दिशा दिली. आपल्या वीर पुत्राच्या या महान पराक्रमामुळे हिडिंबेला देवीचा दर्जा मिळाला, अशी अख्यायिका आहे. याच कारणामुळे पारध गावाचे लोक हिडिंबेला एक देवी मानतात आणि तिची पूजा करतात.
यात्रेची झलक
हा उत्सव ३ दिवस चालतो. पहिल्या दिवशीच हिडिंबेची भव्य मिरवणूक काढली जाते. यावेळी भजन-भारुडं, लाठी-काठी आणि मर्दानी खेळांचे प्रदर्शन केले जाते. यात्रेच्या निमित्ताने एक कुस्तीचा आखाडाही भरवला जातो. यात महाराष्ट्रातील अनेक नामवंत पहिलवान भाग घेतात. गावातले सगळे लोक मिळून या यात्रेचे आयोजन करतात.
मंदिरातील अद्भूत मूर्ती आणि मिरवणूक:
यात्रेच्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात हिडिंबा मातेची भव्य मिरवणूक काढली जाते. यासाठी बांबू, पाचट आणि वाळलेल्या गवताचा वापर करून सुमारे दहा ते वीस फूट उंचीची अक्राळविक्राळ प्रतिमा तयार केली जाते. तिला साजेसा मुखवटा बसवून, आकर्षक साज चढवला जातो. ही मूर्ती बैलगाडीत बसवून गावकऱ्यांकडून तिची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून हा मान येथील बारी समाजाकडे आहे.
या गावात महर्षी पराशर महाराजांचेही एक जागृत देवस्थान आहे. त्यांची समाधी रायघोळ नदीच्या पात्रामध्ये आहे. त्यांच्या नावावरूनच या गावाचे नाव ‘पारध’ पडले. या गावाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक असा समृद्ध वारसा लाभलेला आहे.
पारध गावाचा अनोखा वारसा:
जालना जिल्ह्यात येत असूनही पारधची बाजारपेठ बुलढाणा जिल्ह्यातील धाड गावाशी जोडलेली आहे. रायघोळ नदीच्या तीरावर वसलेल्या या गावाला केवळ धार्मिकच नव्हे, तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे. सासरी गेलेल्या मुलीसुद्धा या यात्रेसाठी आवर्जून माहेरी येतात, यातूनच या देवस्थानावरील गावकऱ्यांची अपार श्रद्धा दिसून येते.
या अनोख्या यात्रेत एका राक्षसिणीची देवी म्हणून पूजा करण्याची प्रथा आजही सुरू आहे, हीच गोष्ट पारध गावाला देशभरात एक विशेष ओळख मिळवून देते.
या वर्षीचा हा अनोखा उत्सव D9 news चॅनेलवर जेष्ठ पत्रकार रवी लोखंडे यांच्या माध्यमातून थेट पाहता येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या या अनोख्या परंपरेबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्कीच त्यांच्या https://youtube.com/@d9newsmarathi?feature=shared या चॅनेलला भेट देऊ शकता.