विद्यार्थ्यांच्या हातात ज्ञानाची शिदोरी! शिक्षकाचा वाढदिवस ठरला आगळावेगळा
By तेजराव दांडगे

विद्यार्थ्यांच्या हातात ज्ञानाची शिदोरी! शिक्षकाचा वाढदिवस ठरला आगळावेगळा
पारध, दि. ०८ (प्रतिनिधी): वाढदिवस म्हणजे केक, मेणबत्त्या आणि पार्ट्या… पण भोकरदन तालुक्यातील पारध येथील जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक पर्यवेक्षक महेंद्र लोखंडे यांनी हा साचा मोडला. ९ सप्टेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करताना त्यांनी कुठलेही सोपस्कार न करता एक अनोखी भेट दिली. “आपण समाजाचे काही देणे लागतो,” या उदात्त भावनेतून त्यांनी विद्यालयातील ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.
ही कृती खऱ्या अर्थाने एक वेगळा आदर्श निर्माण करणारी ठरली. विद्यालयाच्या प्राचार्या शर्मिला शिंदे लोखंडे, ज्येष्ठ शिक्षक आर.ए. देशमुख, प्रा. संग्रामराजे देशमुख, विजया कदम, मृदुला काळे, लता वानखेडे, प्रा. सुनील हजारे यांच्यासह सर्व शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा स्तुत्य उपक्रम पार पडला.
महेंद्र लोखंडे यांच्या या कृतीने विद्यार्थ्यांना केवळ शालेय साहित्यच मिळाले नाही, तर शिक्षणाप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि सामाजिक जाणीव याचेही दर्शन घडले. वाढदिवसाचा खर्च टाळून तो शिक्षणासाठी वापरण्याचा त्यांचा हा निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे.