Jalna: लिफ्ट मागुन ब्लॅकमेल करणारी टोळी दीड तासात जेरबंद; दोन महिला व एका पुरुषाला अटक, 4 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त
By तेजराव दांडगे

Jalna: लिफ्ट मागुन ब्लॅकमेल करणारी टोळी दीड तासात जेरबंद; दोन महिला व एका पुरुषाला अटक, 4 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त
जालना, दि. 16: लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीला ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा आणि अंबड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अवघ्या दीड तासात जेरबंद केले आहे. या कारवाईत दोन महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून 4 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घडलेली घटना अशी: दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 3:30 वाजता फिर्यादी जगन्नाथ पांडुरंग नागरे (वय 56, व्यवसाय-शिक्षण, रा. समर्थनगर, जालना) यांनी अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यांनी सांगितले की, दहा दिवसांपूर्वी त्यांनी एका अनोळखी महिलेला अंबड चौफुली ते पाण्याची टाकी दरम्यान दुचाकीवर लिफ्ट दिली होती. त्यावेळी महिलेने आपण आयुर्वेदिक औषधे विक्री करत असल्याचे सांगितले.
फिर्यादी यांनी लिव्हरच्या औषधाबाबत विचारणा केल्याने महिलेने त्यांना 14 एप्रिल 2025 रोजी अंबड येथे घरी बोलावले. औषध देण्याच्या बहाण्याने महिलेने फिर्यादीला घरात बोलावले. तिथे एका पुरुष आणि दुसऱ्या महिलेच्या मदतीने फिर्यादीला कपडे काढायला लावून त्याचे अर्धनग्न फोटो काढले. यानंतर आरोपींनी 3 लाख 50 हजार रुपये देऊन प्रकरण मिटवण्याची धमकी दिली, अन्यथा फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. ब्लॅकमेलला बळी पडलेल्या फिर्यादीने तात्काळ त्यांच्या बँक खात्यातून आरोपीत महिलेच्या खात्यावर फोन-पे द्वारे 1 लाख रुपये पाठवले आणि 2 लाख 50 हजार रुपयांचा चेक दिला. चेक क्लिअर होईपर्यंत आरोपीत महिलेने फिर्यादीची सोन्याची अंगठी आणि आधार कार्ड स्वतःकडे ठेवले. चेक क्लिअर न झाल्याने आरोपीत महिला व पुरुष फिर्यादीकडे उर्वरित 2 लाख 50 हजार रुपयांची मागणी करत होते आणि पैसे न दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत होते.
फिर्यादीची तक्रार ऐकून अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना तातडीने पथक तयार करून आरोपीतांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला व पुरुष 2 लाख 50 हजार रुपये घेण्यासाठी अंबड चौफुली येथे येणार होते. त्यानुसार, अंबड चौफुली परिसरात सापळा रचण्यात आला. सायंकाळी 4:15 वाजता आरोपीत महिला उषा अशोक भुतेकर (वय 32, व्यवसाय-औषध विक्रेता, रा. अंबड जि. जालना) आणि आरोपीत गोकर्ण पंडीतराव जोशी (वय 35, व्यवसाय-शेती/प्लॉटींग ब्रोकर, रा. शिवाजीनगर, ता. अंबड जि. जालना) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून फिर्यादी यांचा 2 लाख 50 हजार रुपयांचा चेक, फिर्यादीची 20 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी, आरोपीताची 4 लाख रुपये किंमतीची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार आणि आरोपीतांचे 20 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल असा एकूण 4 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्यानंतर, सुरेखा विजय पवार (वय 32, व्यवसाय-गृहिणी, रा. बाळानगर, ता. अंबड जि. जालना) या तिसऱ्या महिलेलाही ताब्यात घेण्यात आले. या तिन्ही आरोपीतांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सिध्दार्थ बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, पोउपनि राजेंद्र वाघ, पोउपनि. भगवान नरोडे, पोलीस अंमलदार रामप्रसाद पव्हरे, संभाजी तनपुरे, कैलास खार्डे, सागर बाविस्कर, देविदास भोजने, भागवत खरात, रमेश काळे, रेणुका बांडे, कविता काकस (सर्व स्थागुशा) आणि अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार दिपक पाटील यांनी यशस्वीरित्या पार पाडली.