परतूरात फायनान्स कर्मचाऱ्यांच्या वेशात लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त!
By तेजराव दांडगे

परतूरात फायनान्स कर्मचाऱ्यांच्या वेशात लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त!
जालना, ५ जुलै २०२५: फायनान्स कंपनीचे कर्मचारी असल्याची बतावणी करून परतूरातील एका ऑटो-रिक्षा चालकाकडून जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपीतांना मौजपुरी पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीतांना ७ जुलै २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
काय घडलं होतं?
३ जुलै २०२५ रोजी शेख नूर शेख अमीन (रा. इंदिरानगर, परतूर, जि. जालना) हे त्यांची अपे रिक्षा घेऊन सिमेंटच्या चुली विकण्यासाठी आसपासच्या गावांमध्ये फिरत होते. सर्व चुली विकून ते परतूराला परतत असताना, मौजपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चितळी पुतळी फाट्याजवळ दोन अनोळखी इसमांनी त्यांची रिक्षा अडवली. त्यांनी रिक्षाची चावी काढून घेतल्यानंतर, शेख नूर यांनी विचारणा केली असता, त्या दोघांनी आपण फायनान्स कंपनीचे कर्मचारी असून, रिक्षाचा हप्ता भरला नसल्याचं सांगितलं.
शेख नूर यांनी सध्या पैसे नसल्याचं आणि पुढच्या हप्त्यात पैसे भरणार असल्याचं सांगितलं. मात्र, आरोपीतांनी त्यांना दमदाटी केली. एका आरोपीताने त्यांची रिक्षा पुढे नेली, तर दुसऱ्याने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. नाइलाजाने शेख नूर यांनी चितळी येथील मित्राकडून एक हजार रुपये उसने घेऊन त्यांना दिले. त्यानंतरही आरोपीतांनी समाधान न मानता, शेख नूर यांच्या रिक्षाच्या डिक्कीत ठेवलेले धंद्याचे नऊ हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. त्यानंतर, रिक्षाची चावी त्यांच्या अंगावर फेकून तेथून पसार झाले. या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०९ (४), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांची धडाकेबाज कारवाई!
गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता, जालना पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली मौजपुरी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. घटनास्थळी जाऊन फिर्यादीकडून सविस्तर माहिती घेण्यात आली. गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी बालाजी उर्फ ज्ञानदेव नामदेव खरात (रा. विरेगाव, ता. जि. जालना) आणि सुनील दत्तु गावडे (रा. चितळी पुतळी, ता. जि. जालना) या दोन आरोपीतांना ताब्यात घेतले.
कौशल्यपूर्ण चौकशीत दोन्ही आरोपीतांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीस गेलेला माल आणि वाहन मिळून एकूण २ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मौजपुरी पोलिसांचे आवाहन:
अशाच प्रकारे फायनान्स कर्मचारी असल्याची बतावणी करून जबरी चोरीचे गुन्हे तुमच्या परिसरात घडले असल्यास, तात्काळ मौजपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मौजपुरी पोलिसांकडून करण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई अजयकुमार बंन्सल (पोलीस अधीक्षक, जालना), आयुष नोपाणी (अपर पोलीस अधीक्षक, जालना), विशाल खांबे (उपविभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग अंबड कॅम्प परतूर) यांच्या मार्गदर्शनाखाली मिथुन घुगे (सहा. पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी पो.स्टे मौजपुरी), पोउपनि विजय तडवी, सफौ चंद्रकांत पवार, पोह/मच्छिद्र वाघ, दादासाहेब हरणे, भास्कर वाघ, भगवान खरात, पोअं/प्रशांत म्हस्के, प्रदीप पाचरणे, अविनाश मांटे, सदाशिव खैरे, धोंडीराम वाघमारे यांनी पार पाडली.