ग्रामीण भागाच्या शिरपेचात मानाचा तुरा! स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव स्कूलच्या शिवम ताम्हणेची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
By तेजराव दांडगे

ग्रामीण भागाच्या शिरपेचात मानाचा तुरा! स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव स्कूलच्या शिवम ताम्हणेची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
पारध, दि. १३: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते यशाचे शिखर गाठू शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध बू येथील स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कूल कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयाच्या शिवम ताम्हणे या विद्यार्थ्याने विभागीय स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत थेट राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली जागा निश्चित केली आहे. ग्रामीण भागातून एका विद्यार्थ्याची थेट राज्य स्तरावर निवड होणे, ही शालेय व परिसरासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब ठरली आहे.
दिनांक १० ऑक्टोबर रोजी हिंगोली येथे १४ वर्षांखालील गटासाठी झालेल्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत शिवम ताम्हणे याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. त्याने प्रतिस्पर्धकांना नमवून विभागीय स्तरावर यश मिळवले, ज्यामुळे त्याची निवड राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी योग्य संधीचे सोने कसे करावे, याचा आदर्श शिवमने आपल्या कर्तृत्वाने घालून दिला आहे.
शिवमच्या या यशामागे शाळेचे क्रीडाशिक्षक संतोष सोनुने यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि अथक परिश्रम कारणीभूत ठरले आहेत. सोनुने सरांनी त्याला स्पर्धेसाठी योग्य प्रशिक्षण देऊन तयार केले होते.
शिवमच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेचे संस्थाचालक मनीष श्रीवास्तव, उपसरपंच शेखर श्रीवास्तव आणि विक्रांत श्रीवास्तव यांनी त्याचे विशेष कौतुक केले. तसेच, शाळेचे मुख्याध्यापक लकस सर व सर्व शिक्षक वृंदांनी शिवमचे अभिनंदन करून त्याला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आणि पुढील उज्ज्वल वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.