जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत 436 कोटी नियतव्यय मंजूर
जालना,दि.25: जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 करीता जिल्ह्यांनी सादर केलेल्या प्रारुप आराखड्यांना मान्यता देण्यासाठी तसेच त्यास अंतिम स्वरुप देण्यसाठी उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हानिहाय राज्यस्तरीय बैठकांचे आयोजन दि. 3 फेब्रुवारी, 2025 ते 11 फेब्रुवारी, 2025 या कालावधीत करण्यात आले होते. राज्यस्तरीय बैठकीमध्ये आपल्या जिल्ह्याकडून करण्यात आलेल्या सादरीकरणानंतर जिल्हा योजनेचा नियतव्यय अंतिम करतांना, कार्यान्वयीन यंत्रणांची मागणी, जिल्ह्याचे वैशिष्ट्य, गरजा तसेच शासनाची प्राथमिकता इ. बाबी विचारात घेऊन जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-25 करीता जालना जिल्ह्यासाठी एकूण रुपये 436 कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला. सन 2024-25 करीता जिल्ह्यासाठी 390 कोटी नियतव्य मंजूर झाला होता. सन 2024-25 करीता मंजूर नियतव्य अंतर्गत नागरी भागासाठी विशेष अतिरिक्त नियतव्यय रुपये 22.41 कोटी रुपयांचा वापर करण्यात येणार आहे. तसेच बदनापूर आणि परतूर या आकांक्षित दोन तालुक्याकरीता प्रत्येकी 5-5 कोटी नियतव्यय शासनाने अंतिमत: मंजूर केला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.
राज्यात गतीने होत असलेले नागरीकरण लक्षात घेवून सर्व जिल्ह्यांना नागरीकरणाच्या प्रमाणात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सर्व महानगरपालिका/नगरपालिका/ नगरपंचायती यांना विशेष अतिरिक्त नियतव्यय (Special Additional outlay) उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता विचारात घेऊन, सन 2025-26 या वर्षाकरीता आपल्या जिल्ह्यास मंजूर रुपये 436 कोटी अंतिम नियतव्ययापैकी रुपये 22.41 कोटी इतका नागरी भागासाठीचा विशेष अतिरिक्त नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. या विशेष अतिरिक्त नियतव्ययाचा वापर आपल्या जिल्ह्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या “जनगणना-2011” च्या लोकसंख्येच्या प्रमाणात नागरी भागाच्या विकास कामांसाठी करण्यात येणार आहे.
निती आयोगाकडून जिल्ह्यातील “बदनापूर व परतूर” हे तालुके आकांक्षित तालुके म्हणून घोषित करण्यात आले आहेत. आकांक्षित तालुक्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रति तालुका रुपये 5 कोटी याप्रमाणे रुपये 10 कोटी इतका निधी एक विशेष बाब म्हणून देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे.