अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी दोषींवर कायदेशिर कारवाई करावी : जिल्हाधिकारी आशिमा मित्तल
By तेजराव दांडगे

अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी दोषींवर कायदेशिर कारवाई करावी : जिल्हाधिकारी आशिमा मित्तल
- जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती बैठक संपन्न
जालना, दि.20 : अंमली पदार्थाच्या सेवनामुळे मानवी शरीरावर, मनावर गंभीर परिणाम होत असतात. परिणामत: समाजावर देखील त्याचे गंभीर दुष्परिणाम दिसून येतात. त्याकरीता जिल्ह्यात अंमली पदार्थांचा प्रतिबंधासाठी सर्व विभागांनी सतर्क राहून दोषींवर कायदेशिर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या.
अंमली पदार्थांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी आर.डी. निकाळजे, आयबीचे अक्षय चांदुरकर, हेड पोस्ट ऑफिसचे अमोल बेंडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरिक्षिका आश्विनी म्हस्के,सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासनचे जीवन जाधव, उपविभागीय अधिकारी जालना नायब तहसिलदार शैलेश राजमाने, पार्सल ऑफिसचे आर. रमन,जिल्हा समाज कल्याणचे आर.बी. मांटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी श्रीमती मित्तल म्हणाल्या की, औषध विक्रेत्यांकडून अनेकदा बंदी घातलेल्या औषधांतील काही ठराविक घटक असलेली वेगळी औषधे विक्री केली जातात. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रिसक्रिप्शनशिवाय औषधांची विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी. याकरीता नियमित मेडिकल स्टोअर्सची तपासणी करावी. टपाल विभागाने पार्सलची देवाण-घेवाण करतांना पार्सलमध्ये काय आहे, याची तपासणी करावी. अंमली पदार्थाची विक्री किंवा सेवन करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी.
युवा पिढीना अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाची माहिती होणे आवश्यक आहे. शाळा आणि महाविद्यालयातून विद्यार्थी व युवक-युवतींमध्ये जनजागृतीच्या माध्यमातून अंमली पदार्थाच्या सेवनाचे दुष्परिणाम सांगावे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात खसखस किंवा गांजा पिकाची अवैध लागवड होणार नाही याची कृषी सहायक आणि पोलीस पाटील कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी. शाळा आणि महाविद्यालयापुरतेच मर्यादित न राहता ग्रामीण भागात देखील अंमली पदार्थाच्या सेवनाच्या दुष्परिणामाची माहिती द्यावी. शाळा, महाविद्यालय आणि ग्रामपंचायतस्तरावर व्यापक जनजागृती करण्याचे निर्देशही यावेळी श्रीमती मित्तल यांनी दिले. अंमली पदार्थांविरुध्द गुन्हे व करावयाची कार्यवाहीबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.



