पोलिसांना ‘डायल ११२’ वर खोटी माहिती देऊन त्रस्त करणे पडले महागात; रेलगावच्या एकावर गुन्हा दाखल
By तेजराव दांडगे

पोलिसांना ‘डायल ११२’ वर खोटी माहिती देऊन त्रस्त करणे पडले महागात; रेलगावच्या एकावर गुन्हा दाखल
पारध (जालना): आपत्कालीन मदतीसाठी असलेल्या ‘डायल ११२’ या क्रमांकाचा गैरवापर करून पोलीस यंत्रणेला खोटी माहिती देऊन वारंवार त्रास देणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा कृत्यामुळे खऱ्या गरजू रुग्णांना किंवा नागरिकांना मदत मिळण्यास अडथळा निर्माण होत असल्याने पोलिसांनी ही कठोर कारवाई केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीत मोहन नवलसिंग चंदनसे (वय ३८ वर्षे, रा. रेलगाव, ता. भोकरदन) याने ९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७:१८ ते ७:४६ च्या दरम्यान आपल्या मोबाईल क्रमांकावरून ‘डायल ११२’ वर वारंवार कॉल केले. कोणत्याही ठोस कारणाशिवाय त्याने पोलिसांना चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिली. तपासात हे सर्व कॉल्स एमडीटी (MDT) प्रणालीवर नोंद असल्याचे समोर आले आहे.
कायदेशीर कारवाई
पोलीस कर्मचारी सुरेश गजानन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीताविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २१२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शासकीय यंत्रणेचा वेळ वाया घालवणे आणि पोलिसांना जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
पोलीस प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
डायल ११२ ही सेवा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि तातडीच्या मदतीसाठी आहे. या सुविधेचा वापर केवळ अत्यावश्यक प्रसंगीच करावा. खोटी माहिती देणे हा कायद्याने गुन्हा असून, अशा व्यक्तींमुळे गरजूंपर्यंत मदत पोहोचण्यास उशीर होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना या सुविधेचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.



