आन्वापाडा येथे तरुणाला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण; पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By तेजराव दांडगे

आन्वापाडा येथे तरुणाला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण; पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पारध, दि. ०८ (जालना): भोकरदन तालुक्यातील आन्वापाडा येथे एका १८ वर्षीय तरुणाला किरकोळ वादातून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पारध पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तपशील
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी करण संतोष उमरे (वय १८, रा. आन्वापाडा) हे मजुरी काम करतात. ७ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास आन्वापाडा येथील राजू सोनवणे यांच्या गोडाऊनसमोर ही घटना घडली.
आरोपीत मुकीम मोसीन कुरेशी याने जुन्या वादाचा राग मनात धरून फिर्यादीला गाठले. “तू दुपारी मला का दम दिला, तुझी लायकी आहे का?” असे म्हणून फिर्यादीच्या नाकावर जोरात बुक्का मारून दुखापत केली. इतकेच नव्हे तर, फिर्यादीच्या जातीचा उल्लेख करून सार्वजनिक ठिकाणी अपमानित केले आणि “तुम्हा सर्वांना पाहून घेईन” अशी जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलीस कारवाई
या घटनेची गांभीर्याने दखल घेत, जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) एस.डी. माने यांनी गुन्हा नोंदवला आहे.
दाखल कलमे: BNS 2023: कलम ११५ (२), ३५२, ३५१ (२) (३).
अ.जा. जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा १९८९: कलम ३(१)(r)(s), ३(२) (va).
पुढील तपास
या गुन्ह्याचा पुढील तपास भोकरदन विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) डॉ. नितीन कटेकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.



