सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून साजरी
By तेजराव दांडगे

सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून साजरी
पारध (ता. भोकरदन) : स्वर्गीय राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय येथे शुक्रवार, दि. ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक सचिन लक्कस यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कुमारी सिद्धी भुते हिने सावित्रीबाई फुले यांची, तर श्रेया तेलंग्रे हिने महात्मा फुले यांची वेशभूषा साकारली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक दत्ता पाखरे यांनी केले. सहशिक्षिका श्रीमती झोरे यांनी सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी दिलेल्या लढ्याची माहिती दिली, तर श्रीमती लोखंडे यांनी महापुरुषांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांनी भाषण व गीतगायनातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सचिन लक्कस यांनी स्त्री शिक्षण व स्त्री समानतेचे महत्त्व विशद केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सूर्यकांत गालफाडे यांनी स्त्रियांचे सक्षमीकरण होणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षकवृंद श्रीमती झोरे श्रीमती नरोटे श्रीमती राऊत श्रीमती देशमुख स्मिता भारती संतोष सोनुने वैभव लोखंडेउपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील सोनुने यांनी केले.



