बनावट ड्रायव्हिंग लायसन्स रॅकेटचा पर्दाफाश; जालना पोलिसांची बिहारमध्ये मोठी कारवाई
By तेजराव दांडगे

बनावट ड्रायव्हिंग लायसन्स रॅकेटचा पर्दाफाश; जालना पोलिसांची बिहारमध्ये मोठी कारवाई
जालना, दि. २८: लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स देण्याच्या नावाखाली बनावट वेबसाईट तयार करून शासनाची फसवणूक करणाऱ्या टोळीचा जालना पोलिसांनी छडा लावला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने बिहार राज्यातून मुख्य आरोपीला अटक केली असून, या कारवाईमुळे आंतरराज्यीय रॅकेट उघडकीस आले आहे.
नेमकी घटना काय?
नोव्हेंबर २०२५ मध्ये जालना येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अभिजीत बावस्कर यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अज्ञात आरोपींनी सरकारी संगणक प्रणालीत अनधिकृत प्रवेश करून बनावट वेबसाईटच्या माध्यमातून नागरिकांना बनावट लर्निंग लायसन्स देऊन आर्थिक लूट केल्याचे तक्रारीत नमूद होते. यावरून भारतीय न्याय संहिता आणि आय.टी. ॲक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बिहारमधून आरोपीला बेड्या
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली होती. तपासादरम्यान आरोपी बिट्टूराज प्रमोद यादव (वय २४, रा. टेंगराहा, जि. सहरसा, बिहार) हा वारंवार आपली ठिकाणे बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर जालना पोलिसांनी बिहारमधील सहरसा पोलिसांच्या मदतीने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
जप्त केलेला मुद्देमाल:
गुन्ह्यात वापरलेला लॅपटॉप, आयफोन (iPhone),थम्ब मशीन असा एकूण १,४६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता, ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आधीच दोन आरोपी अटकेत
या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी यापूर्वी जम्मू-काश्मीर मधून फैसल बशीर मीर आणि जालना येथून मुजाहिद उर्फ डॉन रईसोद्दीन अन्सारी या दोघांना अटक केली आहे. यावरून हे रॅकेट देशभर पसरल्याचे स्पष्ट होत आहे.
या पथकाने केली कारवाई
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, सहरसाचे पोलीस अधीक्षक हिमांशु सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पंकज जाधव, सायबर ठाण्याचे निरीक्षक गुणाजी शिंदे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, योगेश चव्हाण आणि त्यांच्या पथकाने केली आहे. यामध्ये सहरसा (बिहार) सायबर सेलच्या पथकाचेही मोलाचे सहकार्य लाभले.
सावधान: नागरिकांनी ड्रायव्हिंग लायसन्स किंवा कोणत्याही शासकीय कामासाठी केवळ अधिकृत सरकारी संकेतस्थळांचाच (उदा. sarathi.parivahan.gov.in) वापर करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




