
पारध येथे आनंदनगरी उपक्रम उत्साहात संपन्न
पारध, दि. २७: भोकरदन तालुक्यातील पारध येथील स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, पारध (शाहू राजा), ता. भोकरदन, जि. जालना येथे शनिवारी आनंदनगरी या उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. यानिमित्त शाळेचे मैदान विविध फुलांनी सजविण्यात आले होते. शाळेच्या प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळी व फुलांची सजावट करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती पूजनाने संस्थाचालक व माजी सभापती मनीष श्रीवास्तव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच श्रीमती काकफळे, उपसरपंच शेखर श्रीवास्तव, ग्रामपंचायत सदस्य, पालकवर्ग तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आनंदनगरी अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले होते. त्यामध्ये इडली, डोसा, पाणीपुरी, गाजर व बीटचा हलवा, चॉकलेट, कुरकुरे, चहा, समोसा, ढोकळा, पोहे, छोले-भटुरे, केळीचे चिप्स आदी चविष्ट पदार्थांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी उत्साहाने ग्राहकांचे स्वागत करत व्यवहारिक अनुभव घेतला.
संस्थाचालक मनीष श्रीवास्तव यांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे व कल्पकतेचे कौतुक केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, व्यवहारिक ज्ञानात वाढ तसेच संवाद व संभाषण कौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने आनंदनगरीसारखे उपक्रम राबविले जात असल्याचे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक लक्कस सर यांनी केले. पाठ्यपुस्तकाबाहेरील उपक्रमांतून विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित करण्याचा शाळेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारीवर्गाने केले. भविष्यातही आनंददायी शिक्षणासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असे मत शाळेचे वरिष्ठ सह शिक्षक रवी तबडे यांनी व्यक्त केले



