शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भोकरदनमध्ये मंगेश साबळे यांचे आक्रमक आंदोलन; प्रशासनाने घेतली दखल
By तेजराव दांडगे

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भोकरदनमध्ये मंगेश साबळे यांचे आक्रमक आंदोलन; प्रशासनाने घेतली दखल
जालना/भोकरदन, दि. २६ : शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि प्रशासकीय दिरंगाईविरोधात छत्रपती संभाजीनगरचे प्रसिद्ध सरपंच मंगेश साबळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भोकरदन येथील तहसील कार्यालयासमोर गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देत साबळे यांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला, ज्याची दखल घेत अखेर प्रशासनाने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
पाच दिवसांपासून तरुण उपोषणावर
शेतकरी पुत्र नारायण लोखंडे आणि विकास जाधव हे गेल्या पाच दिवसांपासून अन्न-पाणी त्यागून उपोषणाला बसले होते. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून मंगेश साबळे यांनी आंदोलस्थळी भेट दिली आणि आंदोलनाची धार वाढवली.
महत्त्वाच्या मागण्या आणि प्रशासकीय त्रुटी
या आंदोलनाद्वारे प्रामुख्याने खालील विषयांकडे लक्ष वेधण्यात आले:
थकीत बिले: गायगोठा, शेततळे आणि विहिरींची प्रलंबित देयके त्वरित अदा करावीत.
प्रशासकीय पारदर्शकता: ‘मस्टर झिरो’च्या कारभारात सुधारणा करून गरजू शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
योजनांची अंमलबजावणी: शासनाच्या लाभदायी योजनांचा लाभ तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा.
’डफडे बजाव’ आंदोलन आणि प्रशासकीय धावपळ
आंदोलनादरम्यान मंगेश साबळे यांनी प्रशासनाच्या संथ कारभाराचा निषेध करण्यासाठी ‘डफडे बजाव’ आंदोलन केले. तहसील आणि पंचायत समिती (BDO) कार्यालयात जाऊन त्यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “शेतकऱ्यांच्या लेकरांच्या भविष्याशी खेळू नका,” अशा शब्दांत त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.
अखेर प्रशास झुकले; उपोषणाची सांगता
आंदोलनाचा वाढता जोर पाहून तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने आंदोलकांशी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊन त्यासंदर्भातील लेखी पत्र १५ ते २० मिनिटांत देण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. प्रशासनाच्या या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.
“हा केवळ दोन तरुणांचा लढा नसून संपूर्ण शेतकरी वर्गाचा लढा आहे. प्रशासनाने जर वेळेत दखल घेतली नाही, तर यापुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल.”
— मंगेश साबळे, सरपंच
या आंदोलनामुळे भोकरदन परिसरात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोठी चर्चा रंगली असून, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कधी होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



