पारध पोलिसांची धावडा परिसरात मोठी कारवाई; जुगार आणि अवैध दारू अड्ड्यांवर छापे
Major operation by Paradh police in Dhavda area; Raids on gambling and illegal liquor outlets

पारध पोलिसांची धावडा परिसरात मोठी कारवाई; जुगार आणि अवैध दारू अड्ड्यांवर छापे
भोकरदन/ (प्रतिनिधी): जालना जिल्ह्यातील पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या धावडा परिसरात पोलिसांनी गुरुवारी (दि. २५ डिसेंबर) सायंकाळच्या सुमारास विविध ठिकाणी धाडी टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत कल्याण मटका जुगारासह बेकायदेशीर देशी दारूची विक्री करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१. कल्याण मटका जुगारावर छापा
पहिली कारवाई धावडा येथील बालाजी मार्केटच्या बाजूला करण्यात आली. सायंकाळी ७:०० वाजेच्या सुमारास विनोद भगवान काकफळे (वय ३२, रा. पोखरी) हा कल्याण मटका नावाचा जुगार खेळवत असताना पोलिसांना आढळून आला. त्याच्याकडून पोलिसांनी २,६०० रुपये रोख जप्त केले आहेत. या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१७/२०२५, कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२. अवैध देशी दारू जप्त
दुसरी कारवाई धावडा येथील पवन पाणी फिल्टर जवळ सायंकाळी ५:४० वाजता करण्यात आली. येथे प्रकाश संतोष भवटे आणि अविनाश भगवान टेंबरे (दोन्ही रा. धावडा) हे विनापरवाना देशी दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने पिशवीत दारूच्या बाटल्या बाळगताना सापडले. त्यांच्याकडून १,८०० रुपये किमतीच्या १८ देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
तसेच, तिसरी कारवाई साई पूजा हॉटेलच्या बाजूला सायंकाळी ६:२० वाजता करण्यात आली. यामध्ये पांडुरंग मधुगीरी गोसावी (वय ३५, रा. धावडा) याच्याकडून १,१०० रुपये किमतीच्या ११ देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. या दोन्ही कारवायांमध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस पथकाची कामगिरी
सदर कारवाया सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल संतोष गुलाबराव जाधव आणि गणेश किशनराव निकम यांनी केल्या आहेत. या सर्व प्रकरणांचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने साहेब हे करीत आहेत. अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी कडक पावले उचलल्याने परिसरात खळबळ माजली असून परिसरात इतर ठिकाणीही सुरु असलेल्या अवैध धंद्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरीक करीत आहे.



