पारध येथील स्वर्गीय राजेंद्रजी श्रीवास्तव विद्यालयात साने गुरुजी जयंती साजरी
By तेजराव दांडगे

पारध येथील स्वर्गीय राजेंद्रजी श्रीवास्तव विद्यालयात साने गुरुजी जयंती साजरी
पारध (शाहूराजा): भोकरदन तालुक्यातील पारध येथील स्वर्गीय राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात थोर समाजसुधारक आणि साहित्यिक साने गुरुजी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
साने गुरुजींचे विचार हीच खरी मानवतेची शिकवण: प्राचार्य रतन कदम
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य रतन कदम यांनी साने गुरुजींच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, “साने गुरुजी हे केवळ एक शिक्षक नव्हते, तर ते कृतिशील गांधीवादी विचारवंत आणि प्रतिभावंत लेखक होते. ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ ही त्यांची शिकवण आजही समाजाला दिशा देणारी आहे. जातीभेद आणि अस्पृश्यतेविरुद्ध त्यांनी दिलेला लढा ऐतिहासिक आहे.”
’श्यामची आई’ हे संस्कारांचे प्रतीक: मुख्याध्यापक सचिन लक्कस
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना मुख्याध्यापक सचिन लक्कस यांनी विद्यार्थ्यांना संस्कारांचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, “साने गुरुजींचे जीवन म्हणजे सुसंस्कारांची खाण आहे. विद्यार्थ्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतही आपली मूल्ये जपायला हवीत. प्रत्येकाने जीवनात एकदा तरी ‘श्यामची आई’ हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे.”
मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी संस्थेचे सचिव विक्रांत भैय्या श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला सहशिक्षक योगेश मोरे, रवी तबडे, दत्ता पाखरे, वैभव लोखंडे, सुनील सोनुने, संतोष सोनुने, श्रीमती नरोटे, श्रीमती देशमुख, श्रीमती झोरे, श्रीमती राऊत, स्मिता भारती आणि शिक्षकेतर कर्मचारी विष्णू आल्हाट यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.



