राष्ट्रीय लोकन्यायालयात तडजोडीने 1 हजार 104 प्रकरणे निकाली
By तेजराव दांडगे

राष्ट्रीय लोकन्यायालयात तडजोडीने 1 हजार 104 प्रकरणे निकाली
जालना, दि.15 : उच्च न्यायालय,महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि न्यायमुर्ती उच्च न्यायालय मुंबई,न्यायमुर्ती उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ,येथील न्यायमुर्ती तथा जालना न्यायीक जिल्ह्याचे पालक न्यायमुर्ती अरूण आर.पेडणेकर ह्यांनी दुरदृश्यप्रणालीव्दारे उपस्थित राहून मार्गदर्शन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा एम.मोहिते यांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी जालना जिल्ह्यातील सर्व न्यायालयात लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 13 डिसेंबर रोजी पार पडलेल्या लोकन्यायालयामध्ये प्रलंबित व दावा दाखलपुर्व अशी सुमारे 39 हजार 823 प्रकरणे ठेवण्यात आली होती.त्यापैकी 1 हजार 104 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहे.जिल्ह्यामधील न्यायालयात प्रलंबित प्रकरणापैकी एकूण 5 हजार 700 प्रकरणे लोकन्यायालयासाठी ठेवण्यात आली होती. यात दिवाणी,फौजदारी,मोटार अपघात, भूसंपादन आणि 138 एन.आय.ॲक्टच्या प्रकारणांचा समावेश होता. त्यापैकी 542 प्रकरणे निकाली निघाली आहे.तर दाखलपुर्व 34 हजार 123 प्रकरणांपैकी सुमारे 562 प्रकरणे निकाली निघाली आहे. अशी एकुण 1 हजार 104 प्रकरणे निकाली काढण्यात आली. लोकन्यालयामध्ये 17 कोटी 4 लाख 70 हजार 546 एवढ्या रकमेची प्रकरणे निकाली निघालेली आहे. तसेच कौटुंबिक न्यायालयातील प्रलंबित प्रकरणातील लोकन्यायालयामध्ये ठेवण्यात आलेल्या प्रकरणांपैकी 5 परिवारांचा संसार सुखाचा झाला असून पाचही महिला आपल्या पतीच्या घरी नांदण्याकरिता गेल्या आहेत.
यावेळी जिल्हा न्यायाधीश एन.एस.शेख,जिल्हा न्यायाधीश आर.बी.पारवेकर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश जी.आर.ढेपे, सचिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,जालना नितेश एम.बंडगर आणि जालना मुख्यालयातील सर्व न्यायीक अधिकारी, जालना जिल्हा वकील संघ अध्यक्ष अनिरूध्द बी.घुले पाटील,जिल्हा वकील संघाचे सर्व पदाधीकारी,सर्व विधिज्ञ,जिल्हा सरकारी वकील,जिल्हा सरकारी अभियोक्ता यांची उपस्थिती होती.असे प्रभारी सचिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जालना,यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.




