नर्मदा परिक्रमा: अध्यात्मिक शुद्धी आणि आत्मज्ञानाचा पावन प्रवास
By देवानंद बोर्डे

नर्मदा परिक्रमा: अध्यात्मिक शुद्धी आणि आत्मज्ञानाचा पावन प्रवास
पिंपळगाव रेणुकाई, दि. १२ डिसेंबर – नर्मदा परिक्रमा ही ‘अध्यात्मिक शुद्धी आणि आत्मज्ञान मिळवून देणारी पायी परिक्रमा’ आहे, असे प्रतिपादन ह.भ.प. शिवा महाराज बावस्कर यांनी केले. ह.भ.प. विष्णू महाराज सास्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पूर्ण केलेल्या या पायी परिक्रमेच्या पूर्तता सोहळ्यानिमित्त पिंपळगाव रेणुकाई येथे आयोजित केलेल्या एकदिवसीय कीर्तन व महाप्रसादाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
दिनांक २ ऑक्टोबरपासून श्रीक्षेत्र ओंकारेश्वर येथून ह.भ.प. विष्णू महाराज सास्ते, ऋषिकेश महाराज देशमुख, ऋषिकेश महाराज शेलुदकर, रोहित महाराज शेलुदकर व दीपक महाराज बावस्कर यांनी सुरू केलेली ही ‘मैयाची पायी परिक्रमा’ १२ डिसेंबर रोजी परत ओंकारेश्वर येथे पूर्ण झाली.
परिक्रमा पूर्णत्वानिमित्त भव्य सोहळा
या सोहळ्यात ह.भ.प. शिवा महाराज बावस्कर यांचे हरिकीर्तन, तसेच कन्यापूजन, गुरुपूजन, आणि मातृ-पितृ पूजन करण्यात आले. यानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी मा. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या पत्नी निर्मलाताई दानवे, मतकर ताई, तसेच संत-महंत व गुरुवर्य मंडळींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यामध्ये भगवान बाबा, गोविंद बाबा, प्रकाश महाराज जवंजाळ, शालिग्राम महाराज कोदेश्वर, देविदास महाराज केसापूर, प्रल्हाद बाबा कड, ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर, शिवाजी महाराज तळेकर, अजबराव महाराज मिरगे, राधेश्याम महाराज चातुर्मास्ये, भगवान महाराज गाडेकर, प्रदीप महाराज बनकर, अमोल महाराज, आणि इतर अनेक गायक-वादक व गुणीजन महाराज मंडळी सहभागी झाली होती.
नर्मदा परिक्रमेचे महत्त्व
ह.भ.प. शिवा महाराज बावस्कर यांनी नर्मदा परिक्रमेचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, ही यात्रा सुमारे ३,५०० किमी लांबीची आहे. ही एक अत्यंत पवित्र आणि शारीरिक व मानसिक शक्ती देणारी यात्रा असून, ती नियमांचे पालन करून आणि निसर्गाचा आदर करत पूर्ण केली जाते. पायी परिक्रमा पूर्ण होण्यास ३ महिन्यांहून अधिक काळ लागतो आणि ही यात्रा निसर्गाच्या सान्निध्यात आत्मिक शुद्धीसाठी केली जाते.
परिक्रमावासी ह.भ.प. विष्णू महाराज सास्ते यांचे गौरवशाली मनोगत
परिक्रमा पूर्ण करणारे ह.भ.प. विष्णू महाराज सास्ते यांच्या कार्याविषयी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
• ह.भ.प. अजबराव महाराज मिरगे यांनी सास्ते महाराजांच्या गुणांचे कौतुक करत म्हटले की, त्यांच्या मनात कोणाविषयी कधी वैर नसते हा त्यांचा मोठा गुण आहे. ते लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना हवेहवेसे असणारे व्यक्तिमत्त्व आहे.
• भगवान महाराज गाडेकर यांनी सांगितले की, गुरुवर्य भगवान बाबांनी आम्हाला आळंदी येथील श्री सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत दाखल केले. सास्ते महाराजांच्या संगतीने संबंध जिव्हाळा आणि मित्रत्व काय असते हे कळाले, ज्यामुळे आमच्या जीवनाचे फळ मिळाले. कोणाकरताही जीवाची पर्वा न करता वेळ देणारे व्यक्तिमत्त्व आम्हाला लाभले.
• गुरुवर्य भगवान बाबा यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, काही शिष्य खरोखर वेगळे असतात आणि त्यांच्या जीवनात अध्यात्माची आवड निर्माण व्हावी लागते. एवढा व्याप आणि प्रपंचाचा त्याग करून सास्ते महाराजांनी ही परिक्रमा पूर्ण केली. त्यांनी मी दाखविलेल्या मार्गावर तंतोतंत चालल्यामुळेच हे फळ मिळाले, याचा मला मनस्वी आनंद आहे.
यावेळी राधेश्याम महाराज चातुर्मास्ये व शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व स्नेही मंडळी आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.



