वीज बिलाच्या मनमानी कारभाराला चाप: ग्राहक आयोगाचा महावितरणला दणका; सदोष बिल रद्द करून नुकसान भरपाईचे आदेश
By तेजराव दांडगे
वीज बिलाच्या मनमानी कारभाराला चाप: ग्राहक आयोगाचा महावितरणला दणका; सदोष बिल रद्द करून नुकसान भरपाईचे आदेश
“वीज विभागाने आता सावध राहावे” – अॅड. महेश एस. धनावत
जालना: अतिरिक्त आणि सदोष वीज बिल पाठवून ग्राहकाला मानसिक त्रास देणे महावितरणला चांगलेच महागात पडले आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एका महत्त्वपूर्ण निकालात महावितरणचा मनमानी कारभार ताणून धरला असून, तक्रारदार महिलेला दिलेले सदोष वीज बिल आणि त्यावरील दंडव्याज रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. इतकेच नव्हे, तर शारीरिक व मानसिक त्रासापोटी आणि तक्रारीच्या खर्चापोटी ५,००० रुपयांची नुकसान भरपाई ३० दिवसांच्या आत देण्याचे निर्देशही दिले आहेत. या निकालामुळे वीज विभागाने आता सावधगिरी बाळगावी, अशी प्रतिक्रिया अॅड. महेश एस. धनावत यांनी व्यक्त केली आहे.
भोकरदन तालुक्यातील तांदूळवाडी येथील रहिवासी असलेल्या निर्मलाबाई भुजंगराव पाटील यांना महावितरणकडून अवास्तव आणि चुकीचे वीज बिल आले होते. निर्मलाबाई यांचा मासिक वीज वापर साधारणपणे ४० ते ४५ युनिट इतकाच असून, त्यांना दरमहा ५०० रुपयांच्या आसपास बिल येत होते. मात्र, जानेवारी २०२५ मध्ये त्यांना अचानक २१२ युनिट वापराचे २,८४० रुपयांचे बिल पाठवण्यात आले. याशिवाय, १८ सप्टेंबर २०२५ रोजीही त्यांना अतिरिक्त रकमेचे बिल देण्यात आले.
या चुकीच्या बिलांविरोधात निर्मलाबाई यांनी वेळोवेळी महावितरणच्या उप-कार्यकारी अभियंता कार्यालयाकडे तक्रारी केल्या, परंतु त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. मीटर सदोष असल्याची तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. अखेरीस, या सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी अॅड. महेश धनावत, प्रफुल्लसिंह राजपूत, अक्षय कुवरपूरिय, ऐश्वर्या सोनुणे, बोबी अग्रवाल, अश्विनी धनावत यांच्यामार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ च्या कलम ३५ अन्वये तक्रार दाखल केली. त्यांनी सदोष बिल रद्द करून मानसिक त्रासापोटी आणि तक्रारीच्या खर्चापोटी नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली.
आयोगाने दोन्ही बाजूंचे म्हणणे आणि सादर केलेले पुरावे तपासले. आयोगाला असे आढळून आले की:
महावितरणने सादर केलेल्या जून २०२५ ते एप्रिल २०२५ या कालावधीतील वीज वापराच्या तपशिलावरून (CPL) असे दिसून आले की, तक्रारदार निर्मलाबाई यांचा सरासरी मासिक वीज वापर ७० ते १०० युनिटच्या दरम्यान होता व तो कधीही १०० युनिटच्या पुढे गेला नाही.
असे असताना जानेवारी २०२५ मध्ये २१२ युनिटचे बिल देणे हे अवास्तव आणि चुकीचे आहे.
महावितरणने कोणतीही चूक नसल्याचा दावा केला, परंतु ते आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ कोणताही ठोस पुरावा सादर करू शकले नाहीत.
चुकीची बिले पाठवून आणि तक्रारींची दखल न घेऊन महावितरणने तक्रारदाराला विनाकारण शारीरिक आणि मानसिक त्रास दिला आहे, जो सेवेतील त्रुटीचा प्रकार आहे.
वरील बाबी विचारात घेऊन, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने तक्रार अंशतः मंजूर करत खालीलप्रमाणे आदेश दिले:
1. तक्रारदार निर्मलाबाई पाटील यांच्या ग्राहक क्रमांकावरील जानेवारी २०२५ चे सदोष देयक आणि त्यावरील दंडव्याज रद्द करण्यात येत आहे.
2. महावितरणने तक्रारदाराच्या मीटरवरील प्रत्यक्ष वीज वापरानुसार कोणतेही दंड किंवा व्याज न आकारता योग्य वीज बिल द्यावे.
3. तक्रारदाराला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी आणि तक्रारीच्या खर्चापोटी महावितरणने ५,००० रुपये (अक्षरी रुपये पाच हजार मात्र) नुकसान भरपाई द्यावी.
4. या आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आत करावी.
या निकालावर प्रतिक्रिया देताना तक्रारदाराचे वकील आणि ग्राहक वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. महेश एस. धनावत म्हणाले, “आम्ही या निकालाचे स्वागत करतो. हा एका सामान्य ग्राहकाचा मोठा विजय आहे. महावितरणसारख्या मोठ्या कंपन्या अनेकदा ग्राहकांना किरकोळ रकमेच्या बिलांसाठी त्रास देतात आणि त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात. हा निकाल अशा मनमानी कारभाराला चपराक आहे. यापुढे वीज विभागाने ग्राहकांना बिले पाठवताना अधिक काळजी घेतली पाहिजे आणि त्यांच्या तक्रार निवारण प्रणालीत सुधारणा केली पाहिजे. कोणताही ग्राहक अशाप्रकारे पीडित असेल, तर त्याने न घाबरता ग्राहक आयोगाकडे दाद मागावी, त्यांना नक्कीच न्याय मिळेल.”
Dhannawat Law Associates
Adv. Mahesh S. Dhannawat
B.com, L.L.M, G.D.C. & A.
Ex- Vice President
Jalna Dist. Bar Association.
Add: Shivkrupa, Kalikurti,
Dr. R P Road, Jalna (MH) 431203
Mob. 9326704647 / 02482-233581
dhannawat.mahesh@gmail.com

