सदर बाजार पोलिसांकडून मोठी कारवाई: कत्तलीसाठी आणलेल्या ६ गोवंशीय प्राण्यांची सुटका; आरोपीत गजाआड!
By तेजराव दांडगे

सदर बाजार पोलिसांकडून मोठी कारवाई: कत्तलीसाठी आणलेल्या ६ गोवंशीय प्राण्यांची सुटका; आरोपीत गजाआड!
जालना: चमडा बाजार परिसरात पोलिसांचा यशस्वी छापा
जालना: कत्तल करण्याच्या उद्देशाने गुपचूप गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेल्या सहा गोवंशीय प्राण्यांची सदर बाजार पोलिसांनी तातडीने सुटका केली आहे. याप्रकरणी एका आरोपीवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
गोपनीय माहिती आणि छापा
दिनांक ०४/१२/२०२५ रोजी सकाळी सुमारे ०७:४५ वाजता पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप आणि त्यांच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून चमडा बाजार, जालना परिसरात अवैध कत्तलखान्याबद्दल खात्रीशीर माहिती मिळाली.
माहितीनुसार, ईरफान अब्दुल रहीम कुरेशी (वय ३५ वर्षे, रा. भाजीमंडी, मंगळ बाजार, काद्राबाद, जालना) याने आपल्या दोन गोडाऊनमध्ये कत्तल करण्यासाठी गोवंशीय प्राणी आणून ठेवले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ०८:०० वाजता पोलिसांच्या पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन चमडा बाजार येथील ईरफान कुरेशी याच्या गोडाऊनवर छापा टाकला.
१ लाख १६ हजारांचे गोवंश जप्त
छाप्यादरम्यान आरोपीत ईरफान कुरेशी हा गोडाऊनजवळ मिळून आला. पंचांसमक्ष गोडाऊनची पाहणी केली असता, कत्तल करण्याच्या उद्देशाने आणलेले १ लाख १६ हजार रुपये किमतीचे सहा गोवंशीय प्राणी आणि कत्तल करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले.
गोशाळेत सुरक्षित स्थलांतर आणि पुढील कारवाई
जप्त करण्यात आलेल्या सर्व सहा गोवंशीय प्राण्यांचा पंचनामा करून त्यांची सुरक्षितता लक्षात घेता, त्यांना तात्काळ गोशाळेत जमा करण्यात आले आहे. आरोपीत ईरफान अब्दुल रहीम कुरेशी याच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील कायदेशीर कार्यवाही करत आहेत.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पो.नि. सदंदी भारती (पोलीस ठाणे सदर बाजार) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप, पोहेकॉ/३१७ डिघोळे, पोहेकॉ/३६३ डोईफोडे, पोहेकॉ/१२९२ तडवी, पोहेकॉ/३४१ कानडजे, पोकॉ/१६६ जायभाये यांनी पार पाडली.




