शेतकऱ्यांच्या खात्यावरील ‘होल्ड’ हटला! सागर देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे भोकरदनच्या शेतकरी बांधवांना मोठा दिलासा
By तेजराव दांडगे

शेतकऱ्यांच्या खात्यावरील ‘होल्ड’ हटला! सागर देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे भोकरदनच्या शेतकरी बांधवांना मोठा दिलासा
भोकरदन (जालना): भोकरदन तालुक्यातील पीक कर्जधारक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. समाजसेवक सागर देशमुख यांनी केलेल्या अथक पाठपुराव्यामुळे, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर बँकांनी ‘होल्ड’ लावला होता, त्यांना अखेर त्यांचे शासकीय अनुदान काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अनुदानाची रक्कम जमा, तरीही काढता येत नव्हती!
अतिवृष्टी अनुदान, पीक नुकसानीचे अनुदान किंवा विविध कृषी योजनांचे लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले होते. मात्र, पीक कर्ज थकल्यामुळे बँकांनी त्यांच्या खात्यांवर ‘होल्ड’ (व्यवहार थांबवणे) लावले होते. परिणामी, पैसे खात्यात असूनही शेतकरी ते काढू शकत नव्हते. यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते.
समाजसेवक सागर देशमुख यांचा तातडीने पुढाकार
शेतकऱ्यांची ही गंभीर अडचण लक्षात येताच समाजसेवक सागर देशमुख यांनी त्वरीत पाऊले उचलली. त्यांनी भोकरदन येथील तहसीलदार यांना या समस्येबद्दल सविस्तर माहिती देणारे लिखित निवेदन सादर केले. सरकारी अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांसाठी तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी खात्यांवरील ‘होल्ड’ हटवण्याची मागणी केली.
तहसीलदारांचा त्वरित आदेश; शेतकऱ्यांना दिलासा
सागर देशमुख यांच्या निवेदनाची दखल घेत तहसीलदारांनी तत्काळ कार्यवाही केली. त्यांनी भोकरदन तालुक्यातील सर्व संबंधित बँकांना स्पष्ट आदेश दिले की: १) सरकारी अनुदानावर ‘होल्ड’ लावू नये. २) अतिवृष्टी, पीक नुकसान, ठिबक/तुषार सिंचन सबसिडी यासह सर्व अनुदानाचे वितरण शेतकऱ्यांना अर्ज केल्यानंतर तात्काळ करावे.
या आदेशानंतर अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या खात्यातील अनुदानाची रक्कम काढली आहे, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन गरजा आणि शेतीची कामे मार्गी लागण्यास मदत झाली आहे.
शेतकरी (रामेश्वर लोखंडे) यांची प्रतिक्रिया: “मी तुषार सिंचनाचे अनुदान काढायला गेलो तेव्हा कळालं की कर्ज थकल्याने बँकने अकाउंट होल्ड केलं आहे. सागर देशमुख यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्या प्रयत्नांनी तहसीलदार साहेबांनी पत्र पाठवले. त्यामुळे मला काल आणि आज असे पन्नास-पन्नास हजार रुपये काढता आले. खूप मोठा दिलासा मिळाला.”
शेतकऱ्यांच्या अडचणीच्या वेळी धावून आल्याबद्दल संपूर्ण तालुक्यात सागर देशमुख यांच्या समाजकार्याचे कौतुक होत आहे.



