छत्रपती संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून जालना गुन्हेगारीचा आढावा
By तेजराव दांडगे

छत्रपती संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून जालना गुन्हेगारीचा आढावा
जालना, दि. १६ : छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (विपोम) वीरेंद्र मिश्र यांनी आज (दिनांक १४/१०/२०२५, मंगळवार) जालना पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्याच्या गुन्हेगारी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आणि शाखा प्रमुख उपस्थित होते.
व्हॅनचे लोकार्पण आणि सत्कार
गुन्हे आढावा परिषदेच्या सुरुवातीला वि.पो.म. मिश्र यांच्या हस्ते ‘कम्युनिटी पोलीसिंग’ (सामुदायिक पोलीसिंग) अंतर्गत ‘जनजागरूकता व्हिडिओ व्हॅन’चे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर सप्टेंबर २०२५ महिन्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
प्रलंबित गुन्ह्यांवर लक्ष
या बैठकीत खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरी, चारचाकी चोरी यांसारख्या गंभीर व इतर प्रलंबित गुन्ह्यांचा सखोल आढावा घेण्यात आला. सर्व प्रलंबित गुन्हे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी त्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या.
अंमली पदार्थांवर कठोर कारवाईचे निर्देश
विपोम मिश्र यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (Narcotics Squad) कामाचाही आढावा घेतला. त्यांनी केलेल्या प्रभावी कारवाईबद्दल त्यांचे अभिनंदन करून प्रशस्तीपत्र देण्यात आले. तसेच, भविष्यात अधिकाऱ्यांनी अंमली पदार्थांबाबत अधिक ‘दर्जेदार’ कारवाया करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
दोषसिद्धी वाढवण्यासाठी सूचना
यावेळी त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि प्रभारी अधिकारी यांना जास्तीत जास्त ‘गावभेटी’ देण्यावर भर देण्यास सांगितले. प्रत्येक गावात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत जनजागृती करावी, तसेच नवीन कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करून ‘दोषसिद्धी’चे प्रमाण वाढवण्यावर लक्ष केंद्रित करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
उत्कृष्ट बंदोबस्ताचे अभिनंदन
पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी आरक्षण मोर्चे, गणपती आणि नवरात्री उत्सवादरम्यान उत्कृष्ट बंदोबस्त ठेवल्याबद्दल वि.पो.म. मिश्र यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
या महत्त्वपूर्ण आढावा परिषदेत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.