अवैध दारू विक्रेत्यांवर पारध पोलिसांचा छापा! अनवा परिसरात तब्बल २६४ बाटल्या जप्त, चार जणांना अटक
By तेजराव दांडगे

अवैध दारू विक्रेत्यांवर पारध पोलिसांचा छापा! अनवा परिसरात तब्बल २६४ बाटल्या जप्त, चार जणांना अटक
जालना/पारध, दि. ०१: भोकरदन तालुक्यातील अनवा परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर पारध पोलिसांनी आज, दि. ०१.१०.२०२५ रोजी छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी चार आरोपीतांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे २६,४०० रुपये किमतीच्या एकूण २६४ देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांना अनवा बीट हद्दीत पेट्रोलिंग करताना गुप्त माहिती मिळाली होती की, अनवा गावात आणि कारलावाडी शिवारात मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री सुरू आहे. या माहितीच्या आधारावर, एपीआय संतोष माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने (ज्यात पीसी सुरेश पाटील आणि चापोका फोलाने यांचा समावेश होता) एकाच वेळी तीन ठिकाणी छापे मारले.
जप्त केलेला मुद्देमाल आणि आरोपीत:
पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून खालील चार आरोपीतांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दारूचा साठा जप्त केला:
१) रमेश नारायण जाधव (वय ३४, रा. अनवापाडा) आणि २) ज्ञानेश्वर तुकाराम जाधव (वय ४२, रा. अनवा) यांच्या ताब्यातून २० देशी दारूच्या बाटल्या. ३) सदाशिव शेषराव जाधव (वय २५, रा. अनवा) याच्या ताब्यातून अनवा नाका सेटरमधून ३२ देशी दारूच्या बाटल्या. ४) दत्तू गणपत दौड (वय ६६, रा. कारलावाडी) याच्या ताब्यातून अनवा ते कारलागाडी रोडवरील पत्र्याच्या शेडमधून तब्बल ४ देशी दारूचे बॉक्स (प्रत्येक बॉक्समध्ये ४८ बाटल्या) आणि २० सुट्या बाटल्या (एकूण २१२ बाटल्या).
एकूण २६४ भिंगरी देशी दारूच्या बाटल्या (अंदाजे किंमत २६,४०० रुपये) जप्त करण्यात आल्या आहेत.
या चारही आरोपीतांविरुद्ध पारध पोलीस स्टेशनमध्ये अवैध दारू विक्री कायद्यानुसार कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पारध पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम तीव्र केली असल्याचे या कारवाईतून स्पष्ट दिसत आहे.