Jalna: पारध पोलिसांकडून दोन ठिकाणी कारवाई: गोवंश मासाची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपीतांना अटक; १.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त
By तेजराव दांडगे

Jalna: पारध पोलिसांकडून दोन ठिकाणी कारवाई: गोवंश मासाची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपीतांना अटक; १.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त
पारध, दि. २९: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध पोलिसांनी एकाच दिवशी दोन स्वतंत्र कारवाया करत, अवैधरित्या गोवंश मासाची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपीतांना अटक केली असून या दोन गुन्ह्यांमध्ये एकूण ₹ १,९५,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पारध पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी दिली आहे.
पहिली कारवाई: धावडा ते वालसावंगी रोड
दिनांक २९/०९/२०२५ रोजी सकाळी ०६:२९ वाजता पारध पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित असताना गुप्त बातमीदारामार्फत सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांना माहिती मिळाली की, एक आरोपीत धावडा ते वालसावंगी रोडने मोटारसायकलवर मासाची वाहतूक करत आहे.
या माहितीनुसार पारध पोलीस पथकाने धावडा ते वालसावंगी जाणारे रोडवरील भुयारेश्वर फाटा येथे सापळा रचला. तेथे मोटारसायकल (क्रं.MH-20 FL 6122) थांबवून चालकाची चौकशी केली असता, त्याने आपले नाव उमेर अजीज कुरेशी (वय-२३ वर्षे, रा-कुरेशी मोहल्ला शिवणा, ता-सिल्लोड, जि-छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले. आरोपीताच्या मोटारसायकलच्या सीटवर दोन्ही बाजूंना दोन पोती आढळली.
तपासणी केल्यावर त्या पोत्यांमध्ये अंदाजे ४० किलो वजनाचे गोवंश जातीचे मास आढळून आले. आरोपीत कुरेशी याच्याकडे मास विक्रीचा कोणताही परवाना नव्हता. त्याने सदर मास शिवणा येथील मुस्ताक कुरेशी यांच्याकडून आणल्याचे सांगितले.
या आरोपीताविरुद्ध पोलीस अंमलदार सुनील जाधव यांच्या फिर्यादीवरून गुरनं २३४/२०२५ अन्वये कलम ३२५ भारतीय न्याय संहिता आणि सहकलम ५(c), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी ₹ २०,०००/- किंमतीचे ४० किलो मास आणि ₹ ८०,०००/- किंमतीची मोटारसायकल, असा एकूण ₹ १,००,०००/- चा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्याचा तपास पोउपनि व्ही एस नेमाने हे करत आहेत.
दुसरी कारवाई: अवघडराव सावंगी येथे
पहिली कारवाई सुरू असतानाच, दिनांक २९/०९/२०२५ रोजी सकाळी ०७:१६ वाजता पोलिसांना अवघडराव सावंगी येथे एक आरोपीत मासाची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली.
या माहितीनुसार पोलिसांनी अवघडराव सावंगी येथे कारवाई करत आरोपीत जिया उलहक मोहम्मद शरिफ कुरेशी (वय-४२ वर्षे, रा-कुरेशी मोहल्ला शिवणा, ता-सिल्लोड, जि-छत्रपती संभाजीनगर) याला ताब्यात घेतले. हा आरोपीत मोटारसायकल (क्रं.MH-20 FH-9832) वर दोन पोत्यांमध्ये परवाना नसताना ४० किलो वजनाचे गोवंश जातीचे मास विक्रीसाठी घेऊन जात असताना मिळून आला. त्याने सदर मास सिकंदर कुरेशी (रा-शिवणा, ता-सिल्लोड) याच्याकडून आणल्याचे सांगितले.
या आरोपीताविरुद्ध पोलीस अंमलदार फोलाने यांच्या फिर्यादीवरुन गुरनं २३५/२०२५ अन्वये कलम ३२५ भारतीय न्याय संहिता आणि सहकलम ५ (c), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या ताब्यातून ₹ २०,०००/- किंमतीचे ४० किलो मास आणि ₹ ७५,०००/- किंमतीची मोटारसायकल, असा एकूण ₹ ९५,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोहेकॉ प्रकाश सिनकर हे करत आहेत.
एकूण कारवाई
दोन स्वतंत्र गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी एकूण ₹ १,९५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई जालना पोलीस अधिक्षक अजयकुमार बंन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागिय पोलीस अधिकारी भोकरदन नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि एस. डी. माने, पोउपनि व्ही.एस. नेमाने, पोअ. संतोष जाधव, पोअं सुनील जाधव, पोअ. थिगळे, पोअ. फोलाने, आणि पोअ. पाटील यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.